तंबाखूची जाहिरात झाल्यास थेट कंपनीवर दंडात्मक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:08 PM2019-12-17T12:08:48+5:302019-12-17T12:09:02+5:30
पान ठेल्यावर सिगारेट किंवा तंबाखुची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात पान ठेल्यावर तंबाखु किंवा तंबाखुजन्य पदार्थांची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई होणार आहे. जिल्हा तंबाखु नियंत्रण समितीची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले.
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम मागील काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये तंबाखुमुक्ती जनजागृतीची फलके लावण्यात येत आहेत; परंतु एवढे करून तंबाखुवर नियंत्रण मिळवणे शक्य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावी राबविण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय तंबाखु नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरासह ग्रामीण भागातील पान ठेल्यावर सिगारेट किंवा तंबाखुची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरासह जिल्हाभरातील पानठेल्यावर सूचना फलक लावण्यासोबतच १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकणे कायद्याने गुन्हा आहे, असे फलक लावण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रीती कोगदे, धम्मसेन शिरसाट, जे.बी. अवघड यांनी पॉवर पॉइंटच्या माध्यमातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सादरीकरण केले, तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी. राठोड यांनी पीसीपीएनडीटी कार्यक्रमाविषयी उपस्थित सदस्यांना माहिती दिली. सभेला जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, मानसशास्त्रज्ञ डॉ. दुष्यंत देशपांडे, डॉ. योगेश शाहू, प्रा. मोहन खडसे, प्रा. संकेत काळे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एल.जी. राठोड, डॉ. एम.डी. राठोड, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख शेख, पी.एस.आय. सी.एम. वाघ, गीता अवचार आदी सदस्यांची उपस्थिती होती.
आता तालुका व गावस्तरावर समिती
शहरी भागासह ग्रामीण भागातही तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी तालुका आणि गावपातळीवर स्वतंत्र तंबाखु नियंत्रण समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती बीडीओ यांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती
तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जनजागृती करणे शक्य नाही. त्यामुळे ग्राम पंचायत स्तरावर ही जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीमार्फत परिसरातील शाळांमध्ये तंबाखुमुक्ती जनजागृतीसंदर्भात फलक लावण्यात येणार आहे.