एसटी महामंडळाच्या दाेन माहिती अधिकाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 11:12 AM2020-12-06T11:12:22+5:302020-12-06T11:16:38+5:30
आर. ए. माेरे आणि विद्यमान जन माहिती अधिकारी विनाेद इलामे यांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठाेठावला आहे.
अकाेला : राज्य परिवहन महामंडळाच्या वाशिम आगार व्यवस्थापक तसेच जनमाहिती अधिकारी तत्कालीन व सध्याचे या दाेघांना राज्य माहिती आयाेगाचे अमरावती येथील माहिती आयुक्त यांच्या खंडपीठाने प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठाेठावला. दंडाची ही रक्कम त्यांच्या वेतनातून कपात करून ती शासकीय चालानव्दारे खात्यात जमा करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. वाशिम आगाराचे व्यवस्थापक तथा तत्कालीन जन माहिती अधिकारी आर. ए. माेरे आणि विद्यमान जनमाहिती अधिकारी विनाेद इलामे यांच्याकडे अपिलार्थी नरेशकुमार स्वरूपचंद जैन यांनी वाशिम आगार व्यवस्थापक तथा जन माहिती अधिकारी यांना मानव विकास मिशनच्या निळ्या एसटी बसेस जिल्ह्याबाहेर चालविल्याबद्दलची माहिती मागितली हाेती; मात्र त्यांनी सदरची माहिती वेळेत दिली नाही. त्यानंतर प्रथम अपिलीय अधिकारी व विभागीय नियंत्रक यांनाही माहिती मागितल्यानंतर या प्रकरणाची ऑनलाइन सुनावणी राज्य माहिती आयाेगाचे अमरावती विभागाचे माहिती आयुक्त संभाजी सुरकुंडे यांच्या खंडपीठात झाली. त्यांनी दाेन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर वाशिम आगाराचे व्यवस्थापक तथा तत्कालीन जन माहिती अधिकारी आर. ए. माेरे आणि विद्यमान जन माहिती अधिकारी विनाेद इलामे यांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठाेठावला आहे. ही दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून शासकीय खात्यात गाेळा करण्याचे आदेशात नमूद आहे.