सिंचन विहिरींच्या कामापोटी शेतक-यांची देयके प्रलंबित
By admin | Published: July 7, 2015 01:42 AM2015-07-07T01:42:24+5:302015-07-07T01:42:24+5:30
जिल्ह्यातील शेतक-यांना देयके अदा करण्यासाठी ३ कोटी वितरित.
संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या बांधकामांसाठी (कुशल) शेतकर्यांची देयके अदा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सातही पंचायत समिती स्तरावर ३ कोटी ३७ लाख १६ हजारांचा निधी वितरित करण्यात आला असून, त्यापैकी १ कोटी ७0 लाखांच्या कामांची देयके सोमवारपर्यंत अदा करण्यात आली असून, उर्वरित १ कोटी ६७ लाख १६ हजार रुपयांची शेतकर्यांची देयके अद्यापही प्रलंबित आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा या सातही तालुक्यातील १ हजार ७६९ सिंचन विहिरींची बांधकामे (कुशल कामे) पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार रोहयो विभागामार्फत २५ जून रोजी ३ कोटी ३७ लाख, १६ हजार रुपयांचा निधी सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्यांना वितरित करण्यात आला. हा निधी ग्रामपंचायतींना वितरित करून, सिंचन विहिरींच्या बांधकामांपोटी संबंधित शेतकर्यांची प्रलंबित देयके अदा करण्यात यावे आणि निधी वितरणाचा अहवाल ३0 जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्यांमार्फत पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांना देण्यात आले होते. निधी वितरित करण्यात आल्यानंतर दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र सिंचन विहिरींच्या कामांसाठी देयके अदा करण्याकरिता उपलब्ध निधीतून सोमवापर्यंत १ कोटी ७0 लाखांची देयके अदा करण्यात आली असून, उर्वरित १ कोटी ६७ लाख १६ हजार रुपयांची शेतकर्यांची देयके अदा होणे अद्याप बाकी आहे. प्रलंबित देयकांची रक्कम केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा संबंधित शेतकर्यांकडून केली जात आहे.