अकोल्यात जनतेनेच नाकारला ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 17:36 IST2020-06-01T17:35:16+5:302020-06-01T17:36:17+5:30
जनता कर्फ्यूला जनतेनेच ठेंगा दाखवित लोकप्रतिनिधींना तोंडघशी पाडले आहे.

अकोल्यात जनतेनेच नाकारला ‘जनता कर्फ्यू’
अकोला : अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केले होते; मात्र या आवाहनाला न जुमानता जनताच रत्यावर उतरलेली दिसली. तब्बल ७२ दिवसानंतर अकोल्यात जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांसोबतच अनेक परिसरात इतर दुकानेही उघडल्या गेली होती. त्यामुळे जनता कर्फ्यूला जनतेनेच ठेंगा दाखवित लोकप्रतिनिधींना तोंडघशी पाडले आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पावसाळाही तोंडावर आला आहे अशा स्थितीत कोरोनाची साखळी तुटली नाही तर पावसाळ्यात साथीचे आजारदेखील उद्भवण्याची शक्यता असते. त्यानुषंगाने २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यावर एकमत झाले होते. या ‘जनता कर्फ्यू’ला राज्याच्या मुख्य सचिवांनी मान्यता न दिल्याने अखेर रविवारी रात्री जनता कर्फ्यूला ‘स्वयंस्फूर्त’ करण्याचे आवाहन करण्यात आले होते; मात्र त्याला जनतेने कुठलाही प्रतिसाद दिल्याचे जाणवले नाही.