टाळेबंदी काळात जनता आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:17 AM2021-05-24T04:17:28+5:302021-05-24T04:17:28+5:30

बोरगाव मंजू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ...

People in financial crisis during lockout | टाळेबंदी काळात जनता आर्थिक संकटात

टाळेबंदी काळात जनता आर्थिक संकटात

Next

बोरगाव मंजू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. दुसऱ्या कोविड लाटेच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना आपल्या संसाराचा गाडा ओढणे कठीण झाले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतमजुरांच्या हातालाही काम नाही.

विविध उद्योग व कारखाने बंद असल्याने तरुणांच्याही हाताला काम नाही. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शिक्षण पूर्ण कसे होईल, या विवंचनेत विद्यार्थी सापडले आहेत तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळेल, या आशेवर असलेले तरूण नोकर भरती बंद असल्याने हताश झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील छोटे व्यापारी, दुकानदार हे टाळेबंदी काळात व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत तर अनेकांची दुकाने ही भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे दुकानाचे दर महिन्याचे भाडे, वीजबिल यांची आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य माणूस घरखर्चामुळे कमालीचा धास्तावलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

गरीब जनतेसाठी शासनाने पॅकेज द्यावे!

निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यातच तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेतमजूर व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तरुणांना सुशिक्षित रोजगार भत्ता द्यावा, छोट्या व्यावसायिकांचे कर्ज माफ करावे, बिनव्याजी कर्ज द्यावे तसेच पदवीप्राप्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फी माफ करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Web Title: People in financial crisis during lockout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.