माणसाला माणूस बनविण्याचे काम ग्रंथ करतात - विठ्ठल वाघ
By Admin | Published: February 15, 2016 09:20 PM2016-02-15T21:20:43+5:302016-02-15T21:20:43+5:30
अकोला जिल्हा ग्रंथोत्सवाला थाटात प्रारंभ.
अकोला : आजच्या गढूळ वातावरण मन गढूळ बनविण्याचे काम अनेक गोष्टी करीत आहेत. अशा परिस्थितीत माणसाला त्याच्या मनातील वाईट विचार धुवून काढायचे असतील तर त्याने ग्रंथाकडे वळले पाहिजे. माणसाला माणूस बनविण्याचे काम ग्रंथ करतात असे मत लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन प्रमिलाताई ओक हॉल येथे डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर उज्वला देशमुख होत्या. यावेळी मंचावर आमदार गोवर्धन शर्मा, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, प्रभात किडस्चे संचालक डॉ .गजानन नारे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोपान सातभाई, रंगकर्मी अशोक ढेरे, पत्रकार डॉ. किरण वाघमारे, प्राचार्य डॉ. एस.आर. बाहेती, प्रमिलाताई ओक वाचनालयाचे सचिव मनमोहन तापडिया, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ.विठ्ठल वाघ यांनी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण ग्रंथ देत असल्याचे सांगितले. आपल्या डोळ्यात अंजन घालण्याची कुवत साहित्यात आहे असे सांगतांना विठ्ठल वाघ यांनी कवितेने डोळे दिले कवितेने दृष्टी दिली, कवितेने नवी नवी सृष्टी दिली ही कविता म्हणून दाखविली. लेखक हा कलाकृतीत आपला जीव ओतत असतो. आपण आपल्या कोषातून बाहेर पडून साहित्यकृतीशी एकजीव झालो तर आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. आज चित्रपट, विविध वाहिण्यांमधून कळत-नकळत घाणेरडे संस्कार आपल्या पाल्यावंर पडत आहेत. अशा परिस्थितीत ग्रंथाची संगत केली तर निश्चितच आपल्या मनातील वाईट विकार धुवून निघाल्या शिवाय राहणार असे आशावाद वाघ यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी आपली शेतकर्यांच्या जीवनाचे चित्रण करणारी ह्यपेचह्ण ही कविता सादर केली.
महापौर उज्वला देशमुख यांनी घरातूनच संस्काराचे बीजारोपण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रंथ हे मनाला सुसंस्कारीत करण्याचे काम करीत असतात त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथांची कास धरावी असे आवाहन उज्वला देशमुख यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोपान सातभाई यांनी केले. आभार श्यामराव वाहुरवाघ यांनी मानले.
ग्रंथदिंडीने आणली रंगत
ग्रंथोत्सवाचा आरंभ ग्रंथदिंडीने झाला. खुले नाट्यगृह, गांधी चौक, सिटी कोतवाली, तिलक मार्ग, जुना कापड बाजार, सराफा बाजार, दाना बाजार, जैन मंदीर, गांधी चौक, महापालिका मार्गे प्रमिलाताई ओक हॉल येथे दिंडी पोहोचली. दिंडीत भजनी मंडळ व कलापथकाने सहभाग घेतला व ग्रंथांचे महत्त्व विदित केले.