लोक न्यायालयात ११४६ प्रकरणे तडजोडीने निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:33+5:302020-12-15T04:35:33+5:30
अकोला : राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन अकोला जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी करण्यात आले होते. यामध्ये १ हजार १४६ एवढे न्यायप्रविष्ठ प्रकरणे ...
अकोला : राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन अकोला जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी करण्यात आले होते. यामध्ये १ हजार १४६ एवढे न्यायप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणांमधून तब्बल १० कोटी ४० लाख ६ हजार ५२५ रुपयांची वसुली करण्यात आली.
शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालय तसेच तालुका स्तरावरील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए.ए. सय्यद, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक व राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभय मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्यानंतर २२ बेंचवर प्रकरणे चालवण्यात आली. प्रलंबित असलेले शेकडो न्यायप्रविष्ठ प्रकरणे यावेळी कोर्टासमोर ठेवण्यात आली होती. सामोपचाराने व तडजोडीने ही प्रकरणे पक्षकारांच्या उपस्थितीत निकाली काढण्यात आली. पैशांच्या वसुलीसंदर्भातील २४१ प्रकरणे निकाली निघाली. त्यात तडजोड रक्कम म्हणून ५८ लाख २२ हजार ८२ रुपये वसूल करण्यात आले, तर वाहन अपघात संदर्भातील १७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्या माध्यमातून ६० लाख तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. सर्वाधिक तडजोड शुल्क धनादेश अनादर प्रकरणातून वसूल करण्यात आले. त्यात १४६ प्रकरणे बेंचवर चालवण्यात आली, त्यातून चार कोटी १३ लाख ९७ हजार ३५३ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. पाठोपाठ बीएसएनएल, दिवाणी दावे, पाण्याच्या संदर्भातील देयके, वैवाहिक प्रकरणे, क्रिमीनल कम्पाउंडेबल केसेस मोठ्या संख्येने निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यनशिवराज खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस.एस. बोस यांनी यशस्वी राबवले. यावेळी पक्षकार, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यापूर्वीही आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये विक्रमी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. लोकन्यायालयामध्ये वर्षानुवर्षांपासून सुरू असलेले खटले कोणत्याही खर्चाशिवाय चालवल्या जातात व तत्काळ तडजोडीने प्रकरणे आपसात मिटवली जातात.