धार्मिक स्थळांच्या मुद्यावर लोकप्रतिनिधी एकवटले
By admin | Published: March 10, 2016 02:23 AM2016-03-10T02:23:27+5:302016-03-10T02:23:27+5:30
भाजपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; शिवसेनेची लक्षवेधी.
अकोला: शहरात धार्मिक स्थळे हटवण्याच्या मुद्दय़ावर भाजप-शिवसेनेचे लोकप्रतिनिधी एकवटले असून, बुधवारी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले, तर शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली आहे. याशिवाय कोणत्याही परिस्थितीत 'ओपन स्पेस'वरील धार्मिक स्थळे न हटविण्यासंदर्भात आ.बाजोरिया यांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत चर्चा केली.
२९ सप्टेंबर २00९ नंतर उभारलेली धार्मिक स्थळे हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत मनपा प्रशासनाने कारवाई सुरू केली. मनपाच्या कारवाईत वाहतुकीला अडथळा न ठरणार्या तसेच प्रभागातील 'ओपन स्पेस'वर उभारलेली धार्मिक स्थळे हटवण्यात येत आहेत. रस्त्यालगत तसेच विकासकामांच्या आड येणारी धार्मिक स्थळे हटवण्याबाबत नागरिकांचा आक्षेप नसला तरी प्रभागातील 'ओपन स्पेस'वर उभारलेली धार्मिक स्थळे न हटवण्याची नागरिकांची आग्रही मागणी आहे. अकोलेकरांच्या लोकभावना लक्षात घेता, आ. शर्मा, आ. सावरकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, नगर विकास विभागाच्या सचिवांना मनपा प्रशासनासोबत चर्चा करून तातडीने निर्देश व सूचना जारी करण्याचे आदेश दिले.