महिनाभरात वाढली लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:24 AM2021-08-19T04:24:26+5:302021-08-19T04:24:26+5:30
अकाेला: जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात येत असून लसीकरणाची टक्केवारी वाढत आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत सुमारे ११.३१ टक्के ...
अकाेला: जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात येत असून लसीकरणाची टक्केवारी वाढत आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत सुमारे ११.३१ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.महिनाभरापूर्वी हा आकडा केवळ पाच टक्क्यांवर होता. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १४ लाख ८१ हजार ६९५ लोकांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत २७.४७ टक्के म्हणजेच ४ लाख ६ हजार ९८९ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी सुमारे १ लाख ६७ हजार ५९३ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच आतापर्यंत सुमारे ११. ३१ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. गत महिनाभरात लसीकरणाला वेग आला असून दुसऱ्या डोससाठी विशेष सत्र राबविण्यात आले आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त झाल्याचे दिसून आले. महिनाभरातच लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ५ टक्क्यांवरून ११.३१ टक्क्यांवर आले आहे.
वर्गवारीनुसार लसीकरण
घटक - पहिला डोस - दुसरा डोस (संख्या टक्केवारीमध्ये)
हेल्थ केअर वर्कर्स - ९२.८५ - ६६.७७
फ्रंटलाईन वर्कर्स - ९९.६६ - ७३.३१
१८ ते ४४ वयोगट - १६.९१ - ३.२१
४५ ते ५९ वयोगट - ३३.१८ - १७.४५
६० वर्षांवरील - ५०.९६ - २४.८७
हेल्थ केअर वर्कर्समध्ये उदासीनता
जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला आहे, मात्र अद्यापही अनेक हेल्थ केअर वर्कर्सने लसीचा पहिला डोसही घेतला नसल्याचे दिसून येते. तसेच केवळ ६६.७७ टक्के लोकांनीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ही बाब लक्षात घेता लसीकरणाविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच जनजागृतीची गरज आहे.
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढत आहे. पहिल्या डोससोबतच दुसऱ्या डोससाठीही प्राधान्य दिले जात असून, त्यानुसार नियोजन केले जात आहे. त्यामुळेच दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला