कापशी तलावाच्या विकास कामांना ‘स्थायी’ची हिरवी झेंडी
By admin | Published: May 11, 2016 02:29 AM2016-05-11T02:29:39+5:302016-05-11T02:29:39+5:30
पर्यटनासाठी रस्ते, आवारभिंतीच्या बांधकामाला मंजुरी.
अकोला: कापशी तलावाच्या परिसरात पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या अनुषंगाने ४५ लाख रुपयांतून रस्ते उभारणी तसेच आवारभिंतीसाठी ५४ लाखाच्या निविदेला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. तब्बल १७.८६ कमी दराने दोन्ही कामे सादर करणार्या सिंग कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा सभागृहाने मंजूर केली. महापालिकेच्या मालकीची जागा असलेल्या कापशी तलावाच्या परिसरात अकोलेकरांसाठी पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या प्रयत्नातून १ कोटी ६१ लाख रुपये निधी मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत प्राप्त झाला होता. कापशी तलावाचा परिसर जवळपास ७00 एकरचा असला तरी यापैकी ४२ एकर जागेची शासकीय मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या भागात पर्यटनस्थळ विकसित केले जाईल. दरम्यान, परिसरात आवारभिंत उभारण्यासाठी ९६ लाख २२ हजार रुपयांतून ५४ लाख ८८ हजार ६00 रुपयांची तरतूद तसेच रस्ता बांधकामासाठी ६५ लाख रुपयांतून ४५ लाख ८४ हजार ४४१ रुपयांची तरतूद करून निविदा अर्ज बोलावण्यात आले. या दोन्ही निविदा प्रक्रियेत संबंधित कंपन्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा झाली असता, सिंग कन्स्ट्रक्शन कंपनीची सर्वाधिक १७.८६ टक्के कमी दराची निविदा प्रशासनाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविली. मनपाच्या स्थायी समिती सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या सभेत ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी कापशी तलावाच्या जागेच्या मोजणी प्रक्रियेवरून प्रशासकीय अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.