कोरोना काळात पुरुषांचाही छळ; पत्नीविरोधात पाेलिसात तक्रारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 10:49 IST2021-06-15T10:48:52+5:302021-06-15T10:49:08+5:30
Crime News : पत्नीकडून होत असलेल्या छळाविरुध्द पुरुषांच्या तक्रारीचे प्रमाण कमी असले तरी महिलांचा छळच माेठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

कोरोना काळात पुरुषांचाही छळ; पत्नीविरोधात पाेलिसात तक्रारी!
अकोला : महिलांचा छळ अनेक वर्षांपासून हाेत असल्याचे आपण नेहमीच ऐकताे. काेराेना काळात या प्रमाणात वाढही झाली; परंतु या काळात पुरुषांचाही छळ झाल्याच्या तक्रारी पाेलीस विभागाकडे आहेत. पत्नीकडून होत असलेल्या छळाविरुध्द पुरुषांच्या तक्रारीचे प्रमाण कमी असले तरी महिलांचा छळच माेठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.
काेराेना काळात सर्व कामधंदे बंद असल्याने, अनेक जण घरी असल्याने कुटुंबातील संवाद वाढला. या संवादाचा काहींनी चांगला उपयाेग करून घेतला तर काहींच्या कुटुंबामध्ये वाद झाला. जिल्ह्यात एकूण ४३९ तक्रारी या २०२० व मे २०२१ पर्यंत प्राप्त आहेत. यामध्ये पुरुषांच्या महिलांविरुध्द १३ तर महिलांच्या पुरुषांविरुध्द ४२६ तक्रारींचा समावेश आहे. शहरातील अनेक समाजसेवकांनी हे प्रकरण आपसात केले आहे. तर पाेलीस विभागाकडून १३० प्रकरणात सामंजस्य केले असल्याची नाेंद आहे.
सहवास वाढला भांडणेही वाढली!
काेराेना संसर्गामुळे काेणतेही काम नाही. घरात सर्वांशी सहवास वाढला. या सहवासातून घरी बसल्या बसल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवणे सुरू झाले. सहवास वाढल्याने भांडणेही वाढल्याचे दिसून येते.
२०२० मध्ये १०३ तर चालू वर्षात २७ जणांचे पुन्हा जमले
काेराेना काळात सर्वच जण घरी, त्यातून अनेकांची भांडणे झालीत, तर काहींनी सहवास वाढल्याने आनंदात वेळ घालविला. २०२० व २१ मध्ये महिलांच्या पुरुषांविरुध्द व पुरुषांच्या महिलांविरुध्द एकूण ४४९ तक्रारी प्राप्त झााल्या. यापैकी १३ तक्रारी वगळता सर्व तक्रारी महिलांच्या आहेत. यापैकी महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या साहाय्याने १३० जणांमध्ये सामंजस्य करण्यात आले. यामध्ये २०२० मध्ये १०३ तर चालू वर्षात मे महिन्यापर्यंत २७ प्रकरणाचा समावेश आहे. ही १३० कुटुंबे व्यवस्थित जीवन जगत असून पुन्हा याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.
भांडणाची ही काय कारणे झाली?
काेराेना काळात अनेक जण घरीच असल्याने सहवास वाढला, यातून विविध खाद्यपदार्थांची फर्माइश वाढली. ती पूर्ण न केल्याने, पत्नी माेबाइलवर जास्त वेळ राहते म्हणून भांडण वाढले. दारू पिऊन येऊन घरात धिंगाणा घातला जात असल्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.
पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी १३
भरोसा सेलकडे आलेल्या एकूण तक्रारी ४३९
महिलांच्या पुरुषांविरुद्ध तक्रारी ४२६