पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला; महागाई रडविणार तरी किती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:49+5:302021-02-09T04:20:49+5:30
अकाेला : गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन, शेंगदाणा या खाद्यतेलांसोबतच पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले आहेत. यामध्ये इंधन ...
अकाेला : गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन, शेंगदाणा या खाद्यतेलांसोबतच पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले आहेत. यामध्ये इंधन दरवाढीचा माेठा फटका सामान्यांना बसला आहे. गेल्या चार महिन्यात पेट्राेल २० रुपयांनी तर डिझेल १५ रुपयांनी वाढले आहे. यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीची भर पडली आहे. गॅस सिलिंडरच्या किमती तब्बल ३० रुपयांनी वाढल्यामुळे गृहिणींचेही बजेट काेलमडले आहे.
दिवाळीपासून खाद्यतेलाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे गोरगरीब तथा सर्वसामान्य कुटुंबांमधील गृहिणींचे मासिक आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरानेही उच्चांकी पातळी गाठलेली आहे. यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरवाढीच्या या प्रश्नावर विरोधी राजकीय पक्षांनी आंदाेलने केलीत, मात्र सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सध्या तूर कापणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकरी शहराच्या ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आणत आहेत; मात्र डिझेलचे दर वाढल्याने वाहनमालक अधिकचे पैसे मागत आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालक, मालवाहू वाहनधारक आणि कृषिमालाची ने-आण करणारे वाहनचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
काेट
पेट्राेलच्या दराने शंभरी गाठली आहे, मात्र आता वाहन आवश्यक असल्याने नाइलाजाने पेट्राेल भरावेच लागते सरकारने यावर ताेडगा काढावा केंद्र व राज्याने टाेलवाटाेलवी करू नये, जनतेचा विचार करावा.
- रवींद्र भवाने, नागरिक
काेट
डिझेलच्या किमती वाढल्याने सहाजिकच मालवाहतूक महागली आहे. त्यामुळे किराणा सामानांच्या भाववाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. पेट्राेल, डिझेलच्या दरवाढीचा फटका हा सर्वव्यापी असताे, ताे सध्या अनुभवत आहाेत.
- अभिषेक जाधव, अकाेला