पेट्रोलपंप चालकाची ४ लाखांची रोकड पकडली
By admin | Published: October 13, 2014 01:35 AM2014-10-13T01:35:45+5:302014-10-13T01:35:45+5:30
अकोल्यात निवडणुक पथकाने रोकड पकडली; मात्र रक्कम रोख पेट्रोल विक्रीची.
अकोला: निवडणूक विभागाच्या स्टॅटेस्टिक सर्व्हेलन्स पथकाने रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कृषी विद्यापीठासमोरील जकात नाक्यावर पेट्रोलपंप मालकाच्या कारमधून ४ लाख २७ हजार ५00 रुपयांची रोख पकडली; परंतु ही रोख पेट्रोल विक्रीची असल्याचे स्पष्ट झाले. सध्या ही रोख तात्पुरती सिव्हिल लाईन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
आळशी प्लॉटमध्ये राहणारे नरेश. रा. अग्रवाल यांचा शिवणी येथे पेट्रोलपंप आहे. रविवारी दुपारी ते पेट्रोलपंपावर गोळा झालेली ४ लाख २७ हजार ५00 रुपयांची रोख घेऊन त्यांच्या एमएच ३0 एल ८0९५ क्रमांकाच्या इंडिका कारने घराकडे येत होते. दरम्यान, त्यांची कार निवडणूक विभागाच्या स्टॅटेस्टिक सर्व्हेलन्स पथकाचे प्रमुख व पंचायत समितीतील विस्तार अधिकारी रमेश केशवराव देशमुख यांनी जकात नाक्यावर अडविली आणि कारची तपासणी केली. तपासणीमध्ये रोकड मिळून आली. या ठिकाणी अग्रवाल यांनी ही रोख पेट्रोल विक्रीची असून, त्याचा हिशेबही पेट्रोलपंपावर असल्याचे सांगितले; परंतु देशमुख यांनी त्यांचे काहीएक ऐकून न घेता त्यांना थेट सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात आणले आणि ही रोकड निवडणूकसंबंधी आणली असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पेट्रोल विक्रीचा हिशेबाची कागदपत्रे दिल्यानंतर रोख ताब्यात देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
*भरारी पथकांच्या आततायीमुळे व्यापारी त्रस्त
शहरातील चेकपोस्टवर तैनात करण्यात आलेल्या निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईला व्यापारी त्रस्त झाले आहेत. एमआयडीसी परिसरात अनेक उद्योग असल्याने, लाखो रुपयांची रोख घेऊन व्यापारी शहराबाहेर किंवा शहराच्या आत येतात. भरारी पथके व्यापार्यांच्या कार अडवून तपासणी करतात. व्यापारी रोखचा हिशेब दाखविण्यास तयार असतानाही पथकातील अधिकारी रोख पकडल्याच्या तोर्यात वावरून व्यापार्यांना नाहक त्रास देत असल्याच्या घटना घडत आहेत.