पेट्रोलची १७ लाखांची सबसिडी तीन महिन्यांपासून रखडली!
By admin | Published: March 23, 2017 02:44 AM2017-03-23T02:44:54+5:302017-03-23T02:44:54+5:30
नागरिकांची कॅशलेस योजना पेट्रोल संचालकांसाठी झाली लेसकॅश
अकोला, दि. २२- केंद्र शासनाने जाहीर केलेली 0.७५ टक्क्यांची सबसिडी गेल्या तीन महिन्यांपासून रखडली असून, अकोला जिल्हय़ातील ६५ पेट्रोल पंप संचालक थकीत १७ लाख रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली कॅशलेस योजना पेट्रोल पंप संचालकांसाठी लेसकॅश झाली आहे. पेट्रोल पंप संचालकांची लक्षावधीची रक्कम शासनाच्या धोरणामुळे तीन-तीन महिने गुंतून राहत असल्याने अनेकांना रकमेवर व्याज भरण्याची वेळ येत आहे. अकोल्यासारखी स्थिती राज्यातही असल्याची दाट शक्यता यानिमित्ताने वर्तविली जात आहे.
नोव्हेंबर महिन्यात जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आली. देशभरातील आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले. विस्कळीत झालेली आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी एटीएम आणि क्रेडिट कार्डवर पेट्रोल-डीझल भरणार्या ग्राहकांना प्रत्येक लीटरमागे 0.७५ ची विशेष सबसिडी जाहीर केली. त्यामुळे देशभरातील जनतेने मोठय़ा प्रमाणात पेट्रोल पंपावरील पॉस मशीनचा वापर सुरू केला. यामध्ये अकोला जिल्हय़ातील पेट्रोल पंपही मागे नव्हते. अनेक पेट्रोल पंप संचालकांना, विविध बँकेचे पॉस मशीन घ्यावे लागलेत. 0.७५ टक्क्यांची सूट ग्राहकांनी पेट्रोल भरताना मिळत असल्याने अकोल्यासारख्या ठिकाणी ३0 टक्के लोक कॅशलेसकडे वळले आहेत. एकीकडे शासनाने लोकांना सबसिडी देऊन कॅशलेसच्या व्यवहाराला चालना दिली; मात्र पेट्रोल पंप संचालकांकडून कापल्या गेलेली 0.७५ ची रक्कम अजूनही त्यांना परत मिळालेली नाही. ग्राहकांना दिली जाणारी 0.७५ रुपयांची सबसिडी पेट्रोल पंप संचालकांकडून कापून बँकेने ग्राहकांना दिली आहे. आता एचपी, इंडियन आणि भारत या पेट्रोल कंपनीकडून ही रक्कम बँकेला दिली जाईल आणि त्यानंतर ती पेट्रोल पंप संचालकांना वितरित होत आहे. या किचकट आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी लागतो आहे. दर एका महिन्यानंतर ही रक्कम मिळत आहे. यासंदर्भात शासनाकडे अनेक निवेदने गेलीत; मात्र त्याची दखल अद्याप घेतली गेलेली नाही.
अकोला जिल्हय़ातील ६५ पेट्रोल पंप संचालकांची १७ लाखांची रक्कम तब्बत तीन महिन्यांपासून रखडून आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिली जाणारी सूट शासनाने थेट द्यावी. जेणेकरून तीन महिने रखडण्याची वेळ येणार नाही. बँक आणि पेट्रोल कंपनीच्या व्यवहारात पेट्रोल पंप संचालक भरडले जात आहेत.
-राहुल राठी,
जिल्हाध्यक्ष, अकोला पेट्रोल पंप असोसिएशन.