पाचवा टप्पा: जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’चे स्वरूप आज ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:43 AM2020-05-31T10:43:03+5:302020-05-31T10:43:11+5:30
पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’चे स्वरूप रविवारी जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी चौथ्या टप्प्यातील ‘लॉकडाउन’ची मुदत ३१ मे रोजी संपत असल्याने, पुढील लॉकडाउन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’चे स्वरूप रविवारी जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना १९ मे रोजी शासनामार्फत जाहीर करण्यात आल्या होत्या. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनची मुदत ३१ मे रोजी मध्यरात्री संपुष्टात येत असल्याने, पुढील लॉकडाउन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना ३१ मे रोजी जाहीर होणार आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर, त्यानुसार पुढील लॉकडाउन संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’ स्वरूप ३१ मे रोजी जिल्हा प्रशासनामार्फत भरविण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अकोला शहर ‘रेड झोन’मध्ये असल्याच्या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाउन’चे पुढील स्वरूप निश्चित होण्याची शक्यता आहे.
‘जनता कर्फ्यू’ प्रस्तावाच्या मान्यतेकडे लक्ष!
अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरात १ ते ६ जून दरम्यान सहा दिवसांच्या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय २८ मे रोजी सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. त्यानुषंगाने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मुख्य सचिवांकडून मान्यता मिळते की नाही, याकडे आता लक्ष लागले आहे.
पुढील लॉकडाउन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील ‘लॉकडाउन’ संदर्भात पुढील स्वरूप रविवारी ठरविण्यात येणार आहे.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.