कृषी विषयात ‘पीएचडी’ करणार्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:13 AM2018-01-20T01:13:54+5:302018-01-20T01:14:20+5:30
अकोला : कृषी विषयात पीएचडी (आचार्य) करणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव प्रथमच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास आर्थिक कारणामुळे वंचित राहणार्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल.
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कृषी विषयात पीएचडी (आचार्य) करणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव प्रथमच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास आर्थिक कारणामुळे वंचित राहणार्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली ही चार कृषी विद्यापीठे असून, या कृषी विद्यापीठांतर्गत खासगी व अनुदानित मिळून १९0 कृषी महाविद्यालयातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कृषी विषयातील विविध (बीएससी, एमएससी) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. यातील एमएससी उत्तीर्ण हजारो विद्यार्थ्यांना पुढे विविध विषयांत पीएचडी करायची असते; तथापि अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने पीएचडी करता येत नाही. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. इतर तीन कृषी विद्यापीठेही अनुकूल असून, याबाबतचा प्रस्ताव पाठवित आहेत. चारही कृषी विद्यापीठात दरवर्षी एक हजारांवर विद्यार्थी कृषी, मत्स्य विज्ञान, वनशास्त्र, पशुसंवर्धन, सामाजिक विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान, कीटक शास्त्र, कृषी अर्थशास्त्र, वनस्पती शास्त्र, फलोत्पादन शास्त्र, कृषी हवामान शास्त्र असे अनेक विषयांत पीएचडीला प्रवेश घेतात. त्यासाठी या विद्यार्थ्यांना सामाईक (सीईटी) परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. पीएचडी हा देखील शिक्षणाचाच भाग आहे, पण कृषी एमएससी केल्यानंतर पीएचडीला शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे इच्छा व गुणवत्ता असूनही हजारो विद्यार्थी सीईटीच देत नाहीत. दरम्यान, अशा विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याची संधी मिळावी, यासाठी शासनही अनुकूल असून शिष्यवृत्ती मिळेल, असा विश्वास कृषी विद्यापीठाला आहे. असे झाले तर प्रती महिना पंधरा हजार रुपयांच्या जवळपास ही शिष्यवृत्ती राहील, असे वृत्त आहे.
कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पीएचडी करता यावी, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनही याबाबत अनुकूल आहे. असे झाल्यास पीएचडीपासून वंचित राहणार्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
डॉ.व्ही.एम. भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.