सर्वोपचार रुग्णालयातही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:13 PM2020-07-03T17:13:37+5:302020-07-03T17:13:51+5:30
अकोलेकरांमध्ये कोरोनाचा धाक असला, तरी रुग्णालयातील चित्र वेगळेच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सध्या सर्वोपचार रुग्णालयात इतर रुग्णांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक जण सर्वोपचार रुग्णालयात जाणेही टाळत आहेत. अकोलेकरांमध्ये कोरोनाचा धाक असला, तरी रुग्णालयातील चित्र वेगळेच आहे. येथे रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाइकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता मृत्युदर आणि पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. म्हणूनच किरकोळ आजारी व्यक्तीही उपचारासाठी थेट सर्वोपचार रुग्णालयात जाण्यास टाळत आहेत. कोरोनाचा हा धाक असला तरी सर्वोपचार रुग्णालयातच रुग्णांच्या नातेवाइकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णाला भेटायला येणाºया नातेवाइकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोविड रुग्णांना भेटण्यासाठी गर्दी
सर्वोपचार रुग्णालयात कोविड वॉर्ड परिसरात जाण्यास मनाई असल्याने या ठिकाणी ‘नो एंट्री गेट’ तयार करण्यात आले असून, सुरक्षा रक्षकही तैनात केले आहे; परंतु रुग्णांसाठी जेवणाचा डबा घेऊन येणाºया नातेवाइकांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. काही लोक मास्कचा उपयोग करत असले, तरी त्यांच्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही.
डॉक्टरांकडूनही बेफिकिरी
कोविड वॉर्डातून परत आल्यावर डॉक्टर थेट इतर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येत असल्याचे वास्तव आहे. अनेकदा काही डॉक्टर मास्क न लावताच सहकाºयांशी संवाद साधत असल्याने इतर कर्मचाºयांनाही कळत न कळत कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे.