अकोला: जीएमसी ओपीडीत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 11:34 AM2020-10-17T11:34:11+5:302020-10-17T11:34:18+5:30
Akola GMC रुग्णांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही.
अकोला: रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाला, तरी कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. असे असतानाही सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसंख्या केवळ १० टक्क्यांवर आली होती. मागील १५ दिवसांपासून रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाल्याने हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली, परंतु येथे येणाऱ्या रुग्णांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही. शुक्रवारी येथील अस्थिरोग बाह्यरुग्ण विभागासमोर झालेल्या रुग्णांच्या गर्दीत अनेक जण विनामास्क असल्याचे आढळून आले. सर्वोपचार रुग्णालयात कोरोना संक्रमणाचा जास्त धोका असूनही या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून खबरदारी बाळगण्यात येत नाही. ही बेफिकिरी कोरोनाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरत असून, वेळीच यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे.
जनजागृतीची गरज
कोरोनाविषयी विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे, मात्र सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून बेफिकिरी बाळगण्यात येत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे.