फिजिओथेरेपी ही औषध मुक्त उपचार पद्धती ! - डॉ. अतुल काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 07:07 PM2019-09-07T19:07:43+5:302019-09-07T19:07:52+5:30
अस्थिरोग तज्ज्ञांसह इतर डॉक्टरांच्या समन्वयातून जनसामान्यात फिजिओथेरेपी रुजणार, असे मत फिजिओथेरेपिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना व्यक्त केले.
- प्रवीण खेते
अकोला: फिजिओथेरेपी ही आधुनिक उपचार पद्धती असून याविषयी जनसामान्यात जनजागृतीची गरज आहे. ही उपचार पद्धती विना औषध, विना इंजेक्शन असून केवळ व्यायामाच्या सहाय्याने मासपेशी मजबुत करुन रुग्णाला बरे करते. त्यामुळे रुग्णाला योग्य उपचार मिळावा या अनुषंगाने अस्थिरोग तज्ज्ञांसह इतर डॉक्टरांच्या समन्वयातून जनसामान्यात फिजिओथेरेपी रुजणार, असे मत फिजिओथेरेपिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना व्यक्त केले.
‘फिजिओथेरेपी’ची उपचार पद्धती कशी आहे़?
फिजिओथेरेपी ही विना औषध, विना इंजेक्शन अशी उपचार पद्धती आहे. या अंतर्गत केवळ व्यायाम आणि विविध मशीनच्या सहाय्याने रुग्णांच्या मांसपेशी मजबुत करुन त्यांना बरे केले जाते. विशेषत: असाध्य आजार असलेल्या रुग्णांसाठी ही उपचारपद्धती अधिक प्रभावी असून, लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
फिजिओथेरेपी किती प्रभावी आहे ?
कुठलीच पॅथी पूर्ण नसते. मात्र, फिजिओथेरेपी ही इतर पॅथीच्या सहाय्याने उपचार करते. केवळ फिजिओथेरेपीच्या मदतीने रुग्ण ८० ते ८५ टक्के बरा होऊ शकतो. शिवाय, रुग्णाच्या मांसपेशी मजबुत करण्यास मदत करत असल्याने इतर आजारांपासूनही बचाव करते. त्यामुळे इतर पॅथीसोबतच फिजिओथेरेपी रुग्णांना बरे करण्यासाठी प्रभावी आहे.
कोणत्या रुग्णांसाठी फिजिओथेरेपी प्रभावी ठरते ?
कुठल्याही आजाराची सुरूवात ही मासपेशींपासून होते. त्यामुळे व्यायाम हा एकमात्र उपाय आहे. हेच कार्य फिजीओथेरेपी करत असून, कंबर दुखी, सांधे दुखी, मायग्रेन, डोकेदुखी,गुडघे दुखी, हातापायांना मुंग्या येणे, अपघातानंतर फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धती प्रभावी ठरते.
फिजिओथेरेपी जनसामान्यत रुजवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?
फिजिओथेरेपी ही आधुनिक उपचार पद्धती असून, १९९६ पासून प्रचलनात आली. या तुलनेत अस्थिरोग, मेडिसीन या शाखा कितीतरी जुन्या आहेत. म्हणूनच अस्थिरोग तज्ज्ञ किंवा एमडी मेडिसीन यांच्या समन्वयातूनच फिजिओथेरेपी ही जनसामान्यात प्रभावीपणे पोहोचू शकते. या दोन्ही शाखांचा समन्वय झाल्यास रुग्णांचा रुग्णाला योग्य उपचार मिळण्यास मदत होईलच शिवाय, डॉक्टरांवरील त्यांचा विश्वास अधिक दृढ होईल.
इतर डॉक्टरही व्यायामाच्या टिप्स देऊ शकतात का?
प्रत्येक शाखा वेगळी असून त्याचा अभ्यास वेगळा आहे. त्यामुळे फिजिओथेरेपीच्या टिप्स केवळ फिजिओथेरेपिस्टच योग्य पद्धतीने देऊ शकतो. अनेकदा काही डॉक्टर रुग्णांना चुकीच्या व्यायामाच्या टिप्स देत असल्याने रुग्णांचा त्रास वाढल्याच्या घटना घडल्या आहेत.