ठाणेदार प्रेमानंद कात्रेंची उचलबांगडी

By admin | Published: June 30, 2017 01:26 AM2017-06-30T01:26:23+5:302017-06-30T01:26:23+5:30

सिरसोली येथील गजानन इंगळे आत्महत्या प्रकरण भोवले; रात्री ३ वाजता झाले इंगळेंवर अंत्यसंस्कार

Pick of Thanedar Premanand Katrane | ठाणेदार प्रेमानंद कात्रेंची उचलबांगडी

ठाणेदार प्रेमानंद कात्रेंची उचलबांगडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महिलेच्या विनयभंगप्रकरणी पोलीस चौकशीचा ससेमिरा लागल्याने या कथित प्रकरणात आपल्याला गोवल्या जाऊ नये, या भीतीने सिरसोली येथील गजानन इंगळे या शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर सिरसोलीत निर्माण झालेला तणाव, गावकरी व नातेवाइकांचा रोष पाहता हिवरखेड येथील ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना मुख्यालयात बोलावून घेण्यात आले आहे, तर या ठिकाणी अकोट शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांना हिवरखेड पोलीस स्टेशनचा पदभार देण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी पसार झाले आहेत.
सिरसोली येथील विवाहित महिलेच्या विनयभंगप्रकरणी पोलीस चौकशीला बोलाविलेल्या गजानन इंगळे याने विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान २८ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. गावकरी व नातेवाइकांनी ठाणेदार व गजानन इंगळे यांच्यावर दबाव आणणाऱ्या आरोपींवर कारवाईची मागणी करीत मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पोलिसांनी उशिरा रात्री मृतक इंगळेला धमकी देणाऱ्या आरोपी मोबीन अली सफदर अली, इमदाद अली, इम्रानअली इमदाद अली यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले, तर ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले. उशिरा रात्री ३ वाजता मृतक गजानन इंगळे याच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिरसोली येथे दुपारी ३ वाजल्यापासून रात्री ३ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे यांच्यासह इतर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तळ ठोकून होते, तर हिवरखेड पोलीस स्टेशनला अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान, सिरसोली येथे ग्रामपंचायतमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शांतता ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला ठाणेदार निशांत मेश्राम, तेल्हारा नायब तहसीलदार, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी उपस्थित होते. दरम्यान, २९ जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांची मुख्यालयात बदली केली, तर त्या ठिकाणी अकोट येथील सहायक पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांना हिवरखेड येथे रुजू होण्याचे आदेश दिले.

Web Title: Pick of Thanedar Premanand Katrane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.