तुरीने विक्रम गाठला; पहिल्यांदाच प्रतिक्विंटल दहा हजार रुपये पार, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा
By रवी दामोदर | Published: June 2, 2023 03:12 PM2023-06-02T15:12:02+5:302023-06-02T15:13:07+5:30
देशांतर्गत तुरीचे उत्पादन यंदा घटले. त्यामुळे मागणी व भावही वाढले आहेत.
अकोला : गत काही दिवसांपासून तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षांत यंदा प्रथमच तुरीने दरवाढीचा उच्चांक गाठला असून, विक्रम नोंदवला आहे. शुक्रवार, दि.२ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला आतापर्यंतचा उच्चांकी १०,३५० रुपये क्विंटल रुपये भाव मिळाला आहे. तसेच दिवसभर १ हजार ८६६ क्विंटलची आवक झाली आहे. देशांतर्गत तुरीचे उत्पादन यंदा घटले. त्यामुळे मागणी व भावही वाढले आहेत.
जिल्ह्यात सोयाबीन, कापसासह तुरीचीही मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. गतवर्षी ५० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली होती. अतिवृष्टी व सततच्या पावसाचा तुरीला फटका बसला. त्यात ऐन फुलधारणेच्यावेळी धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सुरूवातीपासूनच तुरीला बाजारात चांगला दर मिळाला. सध्या स्थितीत तुरीला चकाकी आली असून, यंदा प्रथमच तूर १० हजार रुपये प्रति क्विंटल दरावर पोहोचली आहे. तुरीच्या दरात वाढ होत असल्याने आगामी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आठ वर्षांत हमीभाव १ हजार ९७५ रुपयांनी वाढले
शासनाने गेल्या सात वर्षांमध्ये तुरीच्या हमीभावात अवघ्या १ हजार ९७५ रुपयांची वाढ केली आहे. सन २०१५-१६ या हंगामात तुरीला ४ हजार ६२५ रुपयांचा हमीभाव होता. २०१६-१७ या वर्षात ५०५० भाव देण्यात आला. टप्प्याटप्प्याने पुढील चार वर्षांत २०२०-२१ मध्ये तुरीला ६ हजार रुपये तर २०२१-२२ मध्ये ६३०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. तसेच सन २०२२-२३ मध्ये तूरीला ६ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला होता.
देशात घटले तुरीचे उत्पादन, दर राहणार तेजीत
देशात यंदा तुरीच्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. त्यामुळे बाजारात टंचाई जाणवत असून, दुसरीकडे मागणीत वाढ झाली आहे. तसेच गेल्या हंगामातील शिल्लक साठाही कमी असल्याने तुरीच्या दरात तेजी आहे. जगभरातही तुरीचे उत्पादन घटले असून, भाव तेजीत आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी आणखी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.