उघड्यावरच पिली जाते दारू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:19 AM2017-09-15T01:19:13+5:302017-09-15T01:20:04+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाईन बार, दारूची दुकाने बंद झाली होती. त्यामुळे महिला वर्गात आनंद व्यक्त झाला; परंतु आता पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याबरोबर लगेचच वाईन बार, वाईन शॉप पटापट उघडल्याने मद्यपींच्या आनंदाला तर उधाण आले. शहरातील काही वाईन शॉप मालकांनी तर देशी, विदेशी दारू विक्रीसोबतच मद्यपींच्या पिण्याची सुद्धा सोय केली आहे. नियमानुसार वाईन शॉप मालकांना दारू विक्री करता येते; परंतु पिण्याची व्यवस्था करता येत नाही. असे असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांच्या नाकावर टिच्चून वाईन शॉपलगतच मद्यपी दारू रिचवित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाईन बार, दारूची दुकाने बंद झाली होती. त्यामुळे महिला वर्गात आनंद व्यक्त झाला; परंतु आता पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याबरोबर लगेचच वाईन बार, वाईन शॉप पटापट उघडल्याने मद्यपींच्या आनंदाला तर उधाण आले. शहरातील काही वाईन शॉप मालकांनी तर देशी, विदेशी दारू विक्रीसोबतच मद्यपींच्या पिण्याची सुद्धा सोय केली आहे. नियमानुसार वाईन शॉप मालकांना दारू विक्री करता येते; परंतु पिण्याची व्यवस्था करता येत नाही. असे असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांच्या नाकावर टिच्चून वाईन शॉपलगतच मद्यपी दारू रिचवित आहेत.
‘लोकमत’ चमूने गुरुवारी शहरातील काही वाईन शॉप मालकांनी मद्यपींसाठी दारू पिण्यासाठी केलेल्या व्यवस्थेचे स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंगदरम्यान शहरातील खुले नाट्यगृहासमोरील एका वाइन शॉपलगतच मद्यपींना दारू पिण्याची सोय केल्याचे दिसून आले. अनेक मद्यपी वाईन शॉपवर येऊन दारूच्या बाटल्या विकत घेतात. शॉपचालकाकडून त्यांना पाण्याचे पाउच, पाण्याची बाटली आणि प्लास्टिकचे ग्लास उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे मद्यपी बाजूलाच जाऊन बाटलीतील दारू रिचवितात. तसेच रामदासपेठ परिसरात नव्याने सुरू झालेले वाईन शॉप, रेल्वे स्टेशन रोडवरील वाईन शॉपलगतसुद्धा असा प्रकार पाहायला मिळाला. या वाईन शॉपसमोर तर अनेकांनी पाण्याचे पाउच, चकना विक्रीचे व्यवसाय सुरू केले आहेत. वाईन शॉपमधून दारूच्या बाटल्या विकत घ्यायच्या आणि हातगाडीवरील पाण्याचे पाउच, खाण्याचे साहित्य घेऊन कुठल्या तरी बंद दुकानाच्या समोर बसून मद्य प्राशन करण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दारूसोबतच पाण्याचाही पैसा कमाविण्याच्या नादात वाईन शॉप चालक कायद्याचा भंग करीत आहेत. वाईन शॉप चालकांच्या या कृत्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांचे मूक सर्मथन आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पानटपर्या, हातगाड्या बनल्या दारूचे अड्डे
पोलीस मुख्यालयासमोरच काही पानटपर्या, हातगाड्या मद्यपींचे दारू पिण्याचे अड्डे बनले आहेत. येथील पानटपर्यांवर शीतपेयासोबतच पाण्याच्या बाटल्या, पाउच, चकन्याची पाकिटे मद्यपींसाठी उपलब्ध आहेत. एवढेच नाहीतर येथील व्यावसायिकांनी दारू पिण्यासाठी मद्यपींना सोयसुद्धा उपलब्ध करून दिल्याचे स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिसून आले.
नेहरू पार्कसमोरील हॉटेल बनले बार!
नेहरू पार्कसमोरील दोन हॉटेलला तर रात्रीच्यावेळी चक्क बारचे स्वरूप प्राप्त होते. या हॉटेलमध्ये मद्यपी दारूच्या बाटल्या घेऊन येतात. त्यांना हॉटेलमालकाकडून स्पेशल टेबल, पाणी, चकना, चटणी आणि वेटरची सुविधा पुरविण्यात येते. कायद्याच्या दृष्टिकोनातून हा नियमांचा भंग आहे. पोलीस कर्मचार्यांनासुद्धा याची माहिती आहे; परंतु अर्थपूर्ण संबंधांमुळे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात.
नियमानुसार वाईन शॉप चालकाला मद्यपींची दारू पिण्याची व्यवस्था करता येत नाही. असा प्रकार कोणी करीत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. परवानासुद्धा रद्द होऊ शकतो.
- राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क