सभागृह नेत्यांच्या प्रभागात डुकरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:21 AM2021-01-16T04:21:51+5:302021-01-16T04:21:51+5:30
महापालिका क्षेत्रात माेकाट श्वान, जनावरे व डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. मागील काही दिवसांपासून मनपा प्रशासनाच्या मिळमिळीत भूमिकेचा फायदा उचलत ...
महापालिका क्षेत्रात माेकाट श्वान, जनावरे व डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. मागील काही दिवसांपासून मनपा प्रशासनाच्या मिळमिळीत भूमिकेचा फायदा उचलत वराह पालकांनी डुकरांना माेकाट साेडले आहे. त्यांच्या संख्येतही माेठी वाढ झाली असून, गल्लीबाेळात तसेच कानाकाेपऱ्यात माेकाट डुकरांच्या समस्येमुळे अकाेलेकर वैतागले आहेत. प्रभागांमधील ओपन स्पेसमध्ये आयाेजित कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच मंगल कार्यालये, हाॅटेल, लाॅज आदी परिसरात डुकरांचा वावर नागरिकांसाठी लाजिरवाना व डाेकेदुखी ठरू लागला आहे. माेकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. वराह पालकांना नाेटीसद्वारे सूचना व तंबी न देता प्रशासन या समस्येवर वेळकाढूपणा करीत असल्यामुळे समस्या कायम आहे. यासंदर्भात भाजपच्या सभागृहनेत्या तथा प्रभाग क्रमांक १९ मधील नगरसेविका याेगीता पावसाळे यांनी मनपा प्रशासनाला यापूर्वीही अनेकदा सूचित केले आहे. तरीही माेकाट डुकरांची समस्या कायम असल्याचे पाहून प्रशासनाला इशारा देण्याची वेळ भाजपच्या सभागृहनेत्यांवर ओढवली आहे.
पत्र दिल्यानंतरही कारवाई नाही!
शहरातील मूलभूत सुविधांची कामे तातडीने निकाली काढली जात असल्याचा दावा सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून नेहमीच केला जाताे. दुसरीकडे खुद्द सभागृहनेत्यांनी पत्र दिल्यानंतरही प्रशासन माेकाट डुकरांच्या बंदाेबस्तासाठी पाऊल उचलत नाही. यामुळे भाजपच्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, यावरच प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहे.