पिंपळखुटा-चांगेफळ नदीपात्रातून वाळू व मातीची अवैध वाहतूक सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 08:16 PM2018-02-05T20:16:55+5:302018-02-05T20:19:25+5:30
खेट्री (अकोला): पातूर तालुक्यातील चान्नी व सस्ती मंडळात वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री (अकोला): पातूर तालुक्यातील चान्नी व सस्ती मंडळात वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे.
चान्नी येथील महसूल मंडळाच्या अवघ्या अडीच-तीन किलोमीटर अंतरावर पिं पळखुटा-चांगेफळ नदीपात्रातून जेसीबी मशीनद्वारे वाळू व मातीचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू आहे. पिंपळखुटा येथील मन उतावळी नदीवरील पिंपळखुटा गावाजवळील १७७, १७८, १७९, १८३, १८४, १८५, १८६ या घाटांचे लिलाव झालेले आहेत. परंतु, या लिलाव झालेल्या घाटांच्या नावावर पिंपळखुटा- चांगेफळदरम्यान नदीपात्रातून शेकडो ब्रास वाळू व मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. तसेच सस्ती मंडळांतर्गत खेट्री, शिरपूर येथील विश्वमित्र नदीपात्रातूनसुद्धा वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक करण्यात येत आहे. महसूल विभागाचा वाळू माफियांवरील वचक संपल्याने वाळू माफिया नदीपात्रात रात्रंदिवस उत्खनन करून वाळूची अवैध वाहतूक करीत आहेत.
दरड कोसळल्याच्या घटना सुरूच!
पिंपळखुटा-चांगेफळ नदीपात्रातून मजूर वाळू काढत असताना अनेकवेळा दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, सुदैवाने प्राण हानी झाली नाही. महसूल विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तहसीलदारांच्या आदेशाची पायमल्ली!
वाळू व मातीचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक करणार्या माफियांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सक्त आदेश पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांनी मंडळ अधिकारी, तलाठी व पोलिसांना दिले असले, तरी संबंधित दोन्ही मंडळ अधिकार्यांकडून व पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गाव पातळीवरील कर्मचारी व पदाधिकार्यांना वेळोवेळी लक्ष ठेवून गौण खनिजांचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक करणार्या लोकांवर कठोर कारवाई करण्याबाबत सांगितले आहे. तसेच आतापर्यंत नियमानुसार कारवाई केली आहे आणि पुढेही करण्या त येईल.
पी.एस. रौंदळे, मंडळ अधिकारी, चान्नी.