पिंपळखुटा-वाहळा मार्गाच्या नदीवरील पुलाचे काम रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:39+5:302020-12-06T04:19:39+5:30
सदर पुलाच्या कंत्राट कंत्राटदारांना देण्यातही आला होता; परंतु कंत्राटदारांनी नदीमध्ये खड्डे खोदून तसेच सोडले. त्यामुळे २२ महिन्यांचा कालावधी उलटला; ...
सदर पुलाच्या कंत्राट कंत्राटदारांना देण्यातही आला होता; परंतु कंत्राटदारांनी नदीमध्ये खड्डे खोदून तसेच सोडले. त्यामुळे २२ महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर पुलाचे काम रखडल्याने पिंपळखुटा, चान्नी, खेट्री, शिरपूर, चांगेफळ, उमरा, पांगरा, राहेर, आडगाव आदी गावातील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन नदीतून ये-जा करावे लागत आहे. नदीमध्ये पाणी व मोठमोठे दगड असल्याने पिंपळखुटा गावात बस, दुचाकी, चारचाकी व इतर कोणतेही वाहन येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करून ये-जा करावी लागत आहे. गावात वाहन येत नसल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यासाठी अर्धा किलोमीटर शेतमाल डोक्यावर घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी दखल घेऊन रखडलेल्या पुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
फोटो:
कामासाठी खोदलेले खड्डे धोकादायक!
पुलाच्या कामासाठी कंत्राटदारांनी जे खड्डे खोदले आहे. ते धोकादायक ठरत असून, अनेक वेळा लहान मुले व शेतकऱ्यांची जनावरे या खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन पुलाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
पुलाच्या कामासाठी फक्त कागदोपत्री भूमिपूजन करून फलक लावले आहे. कंत्राटदारांनी खड्डे खोदल्याने अनेक जण पडून जखमी झाले असून, मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाना देशमुख, नागरिक