कापूस पिकावर गुलाबी बाेंडअळीची चाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 10:58 AM2021-08-03T10:58:36+5:302021-08-03T10:58:49+5:30
Pink Bollworm on cotton crop: बाेंडअळीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने बीटी कपाशीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हे संकट यावर्षी पुन्हा निर्माण झाल्याने डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी साेमवारी कीटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांची तातडीची बैठक घेतली असून, विदर्भातील सर्वच कृषी विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु यामुळे पुन्हा बीटी कपाशीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीटी कपाशीमध्ये बाेंडअळीला प्रतिबंधक जीन आहे. असे असताना अलीकडच्या पाच-सहा वर्षांत बीटी कपाशी बाेंडअळीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने बीटी कपाशीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चार वर्षांपूर्वी गुलाबी बाेंडअळीच्या आक्रमणाने ४० टक्केच्या वर कापूस पिकाचे नुकसान केले हाेते. त्यानंतर डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून, बाेंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले. पण ही बाेंडअळी समूळ नष्ट झाली नाही. यावर्षी पुन्हा बाेंडअळीने ताेंड वर काढले असून, विदर्भातील वर्धा, अमरावती व अकाेला जिल्ह्तीयाल काही भागातील कापसावर प्रादुर्भाव दिसून आला आहे. ही अळी कापसाचे प्रचंड नुकसान करीत असल्याने कृषी विद्यापीठ मिशन माेडवर आले आहे.
...तर उत्पादनात प्रचंड घट
कपाशीवर या अळीचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पात्या आणि फुलावर दिसून येत आहे. या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यास कपाशीची फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात या अळीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त हिरव्या बोंडामध्ये होतो. प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात. त्यामुळे कपाशीची प्रत बिघडते. बोंडातील अळ्या रुईमधून छिद्र करून सरकी खात असल्याने रुईची प्रत व सरकीतील तेलाचे प्रमाण खालावून नुकसान हाेत असल्याने शेतकऱ्यांनीही शेताचे सर्वेक्षण करून बाेंडअळी दिसल्यास कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
- विदर्भातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सर्वच तज्ज्ञांची बैठक घेऊन तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत. कपाशीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात एकरी पाच कामगंध सापळे लावावेत, म्हणजे बाेंडअळीचे प्रमाण लगेच दिसून येईल.
- डाॅ़ विलास भाले, कुलगुरू, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेला