पुलाच्या बांधकामासाठी जलवाहिनी कापली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:55 PM2019-03-03T16:55:42+5:302019-03-03T16:56:13+5:30
हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली.
हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली. यामुळे हातरुण, मालवाडा, लोणाग्रा आणि हातला गावातील पाणीपुरवठा एका महिन्यापासून बंद पडलेला आहे. अचानक निर्माण झालेल्या पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच चार गावांना पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. दुष्काळी परिस्थिती असतांना पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
कारंजा रमजानपुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. कारंजा रमजानपूर येथे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बोअरवेल करण्यात आले होते. या बोअरवेल चे पाणी जलकुंभात साठवून प्रत्येक गावात जलवाहिनीद्वारे पोहचण्याची व्यवस्था आहे. मात्र आज रोजी कारंजा रमजानपुर पाणीपुरवठा योजनेसाठी असलेले सहा बोरवेल आटले असून त्यामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. काही बोरवेलच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेला होणारा वीजपुरवठयावर विजेचा लपंडाव होत असल्याने गावागावात पाणी पुरवठा करतांना अडथळा निर्माण होत आहेत. लोनाग्रा, हातरुण, मालवाडा आणि हातला गावात पुलाच्या बांधकामामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुलाचे बांधकाम सुरू असतांना जलवाहिनी कापण्यात आल्याने चार गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला असून या चार गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. मालवाडा गावातील नागरिक बोअरवेलचे खारे पाणी पीत असल्याने पोटाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. कारंजा रमजानपूर योजनेच्या ठिकाणापासून ते शिंगोली, मालवाडा, हातरुण, लोनाग्रा आणि हातला अशी नवीन जलवाहिनी मागील वर्षी टाकण्यात आली. कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजने अंतर्गत अकरा बोअरवेल पैकी सहा बोअरवेल आटल्याने पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. गावागावात बोअवरवेल करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी मालवाडा सरपंच गणेश आढे, लोनाग्रा सरपंच निर्मला सोनोने, सुधाकर बोर्डे, प्रवीण बोर्डे, अक्षय खंडेराव, नीलकंठ कसुरकर, संजय भिलकर, भाजपचे युवा नेते संदीप बोर्डे, गोपाल सोनोने, वैभव दुतोंडे, अमोल चौधरी, गजानन गायकवाड, अंकित खाकरे, शहजाद खान, विशाल ठाकरे, राजेंद्र नसुर्डे, संतोष गव्हाळे, साजिद शाह, शुभम निर्मळ, यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
पाईपलाईन जोडण्यासाठी मुहूर्त सापडेना!
हातरुण आश्रमशाळेसमोर निर्माणाधिन असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी जलवाहिनी कापण्यात आली. त्यामुळे चार गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चार गावातील हजारो नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. रविवारी भाजप कार्यकर्ता मुकेश गव्हाणकर यांनी मालवाडा ग्रामस्थांची भेट घेऊन पाणीटंचाईची समस्या जाणून घेतली. जनतेला पाणी मिळावे म्हणून पाईपलाईन जोडण्यासाठी मुहूर्ताची प्रतीक्षा करू नका. तात्काळ पाईपालन न जोडल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशारा संवाद ग्रुप चे अध्यक्ष मुकेश गव्हाणकर यांनी दिला आहे.
हातरुण आश्रमशाळेसमोर पुलाचे बांधकाम करीत असतांना पाईपलाईन कापण्यात आली आहे. यामुळे चार गावात एका महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर अद्यापही संबधीत विभागाने उपाययोजना केली नाही.पाणी पुरवठा विभागाने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये.
- गणेश आढे, सरपंच, मालवाडा.