पाइपलाइन लिकेज; रस्त्यावर साचले गटार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:13+5:302020-12-30T04:25:13+5:30
वाडेगाव : गावात पाइपलाइनद्वारा पाणीपुरवठा केला जातो. येथील वाॅर्ड क्रमांक २ मधील जागृत चौक ते गंगा टॉकीज या मार्गावर ...
वाडेगाव : गावात पाइपलाइनद्वारा पाणीपुरवठा केला जातो. येथील वाॅर्ड क्रमांक २ मधील जागृत चौक ते गंगा टॉकीज या मार्गावर पाइपलाइन लिकेज झाल्याने रस्त्यावर गटार साचले आहे. पाइपलाइनमधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पाइपलाइनची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जागृत चौक-गंगा टॉकीज रस्त्यावरील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याने गत पंधरा दिवसांपासून रस्त्याने पाणीच पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. रस्ता चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर मेडिकल, क्लिनिक, भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी चिखलातून जावे लागत आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तसेच लिकेज झालेल्या पाइपमधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे, गावात अनेकांना पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाइपलाइनची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी मोहन लोध यांच्यासह नागरिकांनी केली आहे. (फोटो)
-------------------------
पाइपलाइन लिकेज झाल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्यात यावी.
-अंकुश शहाणे, ग्रामस्थ, वाडेगाव.
------------