पितृ पंधरवड्यात भोपळा खातोय भाव; ठोक बाजारात ३०, तर घराजवळ ६० रुपये किलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:39+5:302021-09-24T04:22:39+5:30
दमदार पाऊस झाल्याने शेतातील भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात आवक कमी व मागणी अधिक असल्याने भाजीपाल्याच्या दरात ...
दमदार पाऊस झाल्याने शेतातील भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात आवक कमी व मागणी अधिक असल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे; मात्र या दरवाढीचा फायदा ज्या शेतकऱ्यांजवळ भाजीपाला आहे, अशांनाच होत आहे तर स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपाला येण्यास आणखी वेळ लागणार असल्याने भाजीपाल्याच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)
भाजीपाला बाजारातील दर घराजवळ
दूधी भोपळा ३० ६०
गवार ३५ ५५
कारली २५ ३५
वांगी ३० ४०
कांदे १८ ३०
पालक ३० ५०
टोमॅटो १५ २५
बटाटे १५ २०
फ्लॉवर ३० ५०
सिमला ३५ ५०
मागणी वाढली...
- सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा भाजीपाला खराब झाला आहे.
- परिणामी, ठोक बाजारात अपेक्षित भाजीपाला येत नसल्याचे व्यापारी सांगत आहे.
- त्यामुळे जवळपास सर्वच भाजीपाल्यांच्या काही प्रमाणात दरात वाढ नोंदविल्या जात आहे.
व्यापारी काय म्हणतात?
राज्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. सध्या ग्राहकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात होत असून, अपेक्षित आवक नाही. परिणामी, दरवाढ होत आहे.
- अनंत चिंचोळकर
बाजारात भाजीपाल्याची आवक कमी आहे. आधी पालक ८ ते १० रुपये किलो होता, आता ४० ते ५० रुपये किलोपर्यंत दर पोहोचले आहे. सुरुवातीला टोमॅटो मातीमोल विकल्या गेले. आता चांगले दर मिळत आहे.
- प्रफुल गावंडे
अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?
शहरातील ठोक भाजी बाजारात कोणतीही गृहिणी अथवा नागरिक खरेदीसाठी जात नाही. घराजवळच भाजीपाला विक्रीसाठी येत असल्याने तेथेच खरेदी केल्या जातो. पावभर भाजीपाल्यासाठी दूर जाणे परवडणारे नाही.
- दिव्या इंगळे
५० रुपयांच्या भाजीपाल्यासाठी ३० रुपयांचे पेट्रोल खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे घराजवळ हातगाडीवर येत असलेल्या भाजीपाल्याची खरेदी करते. तसेच आजूबाजूच्या परिसरात भाजीपाल्याची दुकाने आहेत.
- स्मिता देशमुख