महाविद्यालयात आता ‘प्लेसमेंट’ सेल
By admin | Published: January 26, 2015 01:32 AM2015-01-26T01:32:12+5:302015-01-26T01:32:12+5:30
यूजीसीच्या निर्देशानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी.
अकोला : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधूनच कुशल कामगार मिळावे, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अखत्यारित कार्यरत विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांना मोठे महत्त्व आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आढळतात; परंतु या अभ्यासक्रमातून उद्योगधंद्यांना आवश्यक असा कुशल कामगार मिळत नसल्याची ओरड उद्योजकांकडून वारंवार होते असते. त्यानुसार नॅशनल स्किल डेव्हलपमेंट (एनएसडीसी) अंतर्गत उपाययोजना राबविण्याचा विचार पुढे आला. या अंतर्गत कुशल कामगार मिळविण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर कौशल्य विकास योजना राबविण्याचा विचार पुढे आला. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढाकार घेतला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुकाणू समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देशातील सर्व विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल उभारण्याची सूचना करण्यात आली. या सूचनेवर नंतर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध कंपन्यांचे प्रतिनिधी महाविद्यालयांमध्ये जाऊन कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतील, सोबतच या सेल अंतर्गत वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिरांचेदेखील आयोजन केले जाणार आहे. महाविद्यालयांनी सुरू केलेल्या प्लेसमेंट सेल आणि कौशल्य विकासाच्या इतर कार्यक्रमासंदर्भात महाविद्यालयांना वार्षिक अहवाल शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विद्यापीठ अनुदान आयोगाला सादर करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी आणि कुशल कामगार मिळविण्यासाठी या सेलचा मोठा उपयोग होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांनादेखील शिक्षण घेत असतानाच नोकरी मिळविण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. परिणामी बेरोजगारीवरदेखील आळा बसणार आहे.