नाले सफाइच्या कामांवर ६० लाखांच्या उधळपट्टीचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:11 PM2020-04-22T17:11:34+5:302020-04-22T17:12:40+5:30
कंत्राटदारांच्या माध्यमातून नालेसफाईची कामे केल्यास सुमारे ६० लाख रुपयांची देयके प्रशासनाला अदा करावी लागणार आहेत.
अकोला: मान्सूनपूर्व नालेसफाईच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीवर ६० लाखांनी डल्ला मारण्याचा घाट महापालिकेतील काही वरिष्ठ मात्र अनुनभवी अधिकाºयांना हाताशी धरून स्थानिक विभाग प्रमुखांनी रचल्याची माहिती समोर आली आहे. कोरोणाचा मुकाबला करणाºया महापालिकेचे करवसुली लिपिक, शिक्षक, आशा वर्कर तसेच सफाई कर्मचाºयांना अद्यापही सुरक्षा साधनांचा अभाव असताना नालेसफाईवर ही उधळपट्टी
कशासाठी असा सवाल उपस्थित झाला आहे.
महापालिका क्षेत्रातील मोठी नाले तसेच एक मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या नाल्याची मान्सून पूर्व साफसफाई केली जाते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्तांनी नालेसफाईच्या निविदा न काढता क्षेत्रीय अधिकारी, बांधकाम विभाग तसेच स्वच्छता व आरोग्य विभागातील यंत्रणेच्या माध्यमातून नाला सफाई ची कामे मार्गी लावली. नालेसफाईच्या निविदा काढल्या असता कंत्राटदारांकडून थातूरमातूर पद्धतीने कामे केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते . तसेच जाणीवपूर्वक निविदा सादर करण्यास विलंब केल्या जात होता. या सर्व बाबी लक्षात घेता प्रशासनाने मनपाच्या स्तरावर नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावर्षी जीवघेण्या कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे आठ रुग्ण पॉझिटिव असल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोणाला अटकाव घालण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून इतर प्रशासकीय व्यवहार ठप्प झाले आहेत. असे असले तरीही शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई करणे भाग असल्यामुळे मनपातील एका कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी तसेच विभागप्रमुखाने प्रशासनातील एका वरिष्ठ मात्र अनुभव शून्य असलेल्या महिला अधिकाºयाच्या माध्यमातून नालेसफाईसाठी निविदा प्रसिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू केले. कंत्राटदारांच्या माध्यमातून नालेसफाईची कामे केल्यास सुमारे ६० लाख रुपयांची देयके प्रशासनाला अदा करावी लागणार आहेत.
प्लास्टिकचा कचराच नाही!
जीवघेण्या कोरोनाव्हायरसमुळे शहरात 23 मार्च पासून संचारबंदी लागू आहे. या कार्यकाळात प्लास्टिकच्या पिशव्या व प्लास्टिक पासून तयार केल्या जाणाºया इतर वस्तू व साधनांचा वापर एकदम बंद झाला आहे. नाले सफाई करताना मजुरांना सर्वाधिक अडचण प्लास्टिकच्या पिशव्याची होते. यंदा मात्र उण्यापुºया महिनाभराच्या कालावधीत प्लास्टिकचा वापर होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे नालेसफाई करताना ही समस्या निर्माण होणार नसल्याचे बोलले जात आहे.
उत्तर झोनमधील नालेसफाई कशी होणार?
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण उत्तर झोन मधील प्रभाग क्रमांक 11 व दुसरा रुग्ण उत्तर झोन मधील प्रभाग क्रमांक दोन मध्ये आढळून आला. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन आठ झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने प्रभाग क्रमांक दोन व अकरा मधील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. अशा स्थितीत या भागातील नालेसफाई कोण व कशी करणार याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.
नालेसफाईच्या कामांसाठी निविदा काढण्याचा प्रस्ताव काही अधिकाऱ्यांनी व विभागप्रमुखांनी मांडला होता. शहरावर कोरोणाचे सावट पाहता तसेच महापालिकेची एकूणच आर्थिक क्षमता लक्षात घेता ही निविदा प्रसिद्ध न करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर नालेसफाईची कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर करण्याचा आदेश दिला असून त्यासाठी मनपाची यंत्रणा उपलब्ध आहे.
- संजय कापडनीस आयुक्त, मनपा