अकोला जिल्ह्यात ‘रेणू’ योजना राबविण्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:17 PM2019-08-12T12:17:31+5:302019-08-12T12:17:39+5:30
‘रेणू’ उपक्रमाची सुरुवात अकोला जिल्हा परिषदेतून सुरू करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चालविला आहे.
अकोला : ग्रामीण भागातील महिलांना उद्योग निर्मिती, त्याचा विकास आणि संचालनातून रोजगार निर्मितीचा उपक्रम म्हणून अकोला जिल्ह्यात ‘रेणू’ योजना राबविण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. त्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेसह सर्वच बँकांना पत्र देत त्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
महिलांमध्ये उद्योगाबाबत रुची निर्माण करणे, तसेच समूहातील नेतृत्व तयार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. ‘रेणू’ उपक्रमाची सुरुवात अकोला जिल्हा परिषदेतून सुरू करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चालविला आहे. महिला उद्योग निर्मितीसाठी सक्षम यंत्रणांच्या मंजुरीनंतरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी महिला बचत गट आणि त्यांच्या उद्योग प्रकल्पांची पाहणी निकषानुसार करण्याचेही सांगण्यात आले आहे. या उपक्रमासाठी मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया, स्टार्ट अप इंडिया किंवा स्वयं साहाय्यता बचत गटांसाठी कर्ज घेतलेले समूह पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावात त्या बचत गटाचे नोंदणीकृत कार्यालय आवश्यक आहे. कोणत्याही योजनेतील कर्ज मंजुरी लगतच्या म्हणजे, २०१८-१९ किंवा २०१९-२०२० या वर्षातीलच असावी, तसेच महिला उद्योग, बचत गटांचे बँक खाते थकीत असू नये किंवा कोणत्याही कारणास्तव निधी इतरत्र वापरलेला नसावा, या निकषावर ही तपासणी केली जात आहे.
या निकषानुसार पात्र महिला समूह, बचत गटांची माहिती बँकांकडून मागविण्यात आली. त्या महिलांची कार्यशाळा जिल्हा परिषदेत घेतली जाईल. त्यामध्ये रेणू योजनेची निवड प्रक्रिया त्यांना सांगितली जाणार आहे. निवड झालेल्या समूहांना अनुदान मिळणार आहे. त्यासाठी त्यांना मॉर्जिन मनीची अट आहे. सोबतच केंद्र शासनाच्या इतर योजनांतून मिळालेल्या कर्जाचाही त्यामध्ये सहभाग असेल. ही योजना जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू होत आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.