अकोला जिल्ह्यात ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 02:21 PM2019-12-07T14:21:29+5:302019-12-07T14:21:52+5:30
पाटबंधारे विभागाने यावर्षी विक्रमी म्हणजे ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे; परंतु हे पाणी सोडणार केव्हा, हा प्रश्न आहे.
अकोला : जिल्ह्यात प्रकल्प तुडुंब भरलेले असून, रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाने यावर्षी विक्रमी म्हणजे ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे; परंतु हे पाणी सोडणार केव्हा, हा प्रश्न आहे.
काटेपूर्णा प्र्रकल्पात जुलै महिन्यापर्यंत अत्यंत अल्प जलसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले होते. इतरही सर्वच धरणांचा जलसाठा तळाला लागला होता. परतीच्या पावसाने सर्वच प्रकल्पातील जलसाठा वाढला असून, सर्वच मोठे, मध्यम प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. यावर्षी अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातही आजमितीस मुबलक जलसाठा आहे. काटेपूर्णा व वान या मोठ्या प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. मोर्णा, निर्गुणा मध्यम प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठा असून, उमा प्रकल्पात जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.
काटेपूर्णा प्रकल्पातून ८ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येत असते. यावर्षी या प्रकल्पातून रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे.अकोला उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा व दगडपारवा प्रकल्पातून १२ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. उमा व घुंगशी बॅरेजमधून रब्बी हंगामाला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हे सर्व प्रकल्प मिळून ३८ ते ४० हजार हेक्टरवर सिंचन व्यवस्था अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे.
रब्बी पिकांंसाठी यावर्षी पाणी सोडण्यात येणार असले तरी उन्हाळी पिकांबाबत साशंकता आहे. अकोला उपविभागांतर्गत मात्र उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात येण्याची शक्यता पाटबंधारे अभियंत्याकडून वर्तविण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात येणार की नाही, हे रब्बी हंगामातील पाणी वापरल्यानंतर कळणार आहे; परंतु शेतकऱ्यांना मात्र उन्हाळी पिकांनाही पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे.