पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेत उपाययोजनांचे नियोजन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:25+5:302021-07-25T04:17:25+5:30
अकोला : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेत ...
अकोला : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेत घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आले. पूरग्रस्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसल्याने नदी व नाल्यांना पूर आला. त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत बाधित कुटुंबांना आरोग्य आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्ह्यातील नदी व नाल्याकाठच्या गावांमध्ये पूरग्रस्त नागरिकांसाठी शाळा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते, लघुसिंचन विभागांतर्गत जिल्ह्यातील तलाव आणि बंधाऱ्यातील जलसाठ्याची स्थिती व करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात बैठकीत आढावा घेण्यात आला. कृषी, पाणीपुरवठा आणि महिला-बाल कल्याण विभागामार्फत करावयाच्या कामांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट, गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, प्रमोद देंडवे, पुष्पा इंगळे. आम्रपाली खंडारे, विनोद देशमुख, हिरासिंग राठोड, सचिन शिराळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.