वृक्षारोपण केवळ फोटोसेशनपुरतेच!
By admin | Published: July 7, 2017 01:48 AM2017-07-07T01:48:41+5:302017-07-07T01:48:41+5:30
जिल्ह्यात अनेक ठिकाणी खड्ड्यातील रोपटे गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या वतीने राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलैदरम्यान वृक्षारोपण करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांच्या वतीने केलेले वृक्षारोपण केवळ फोटोसेशनपुरतेच असल्याचे ६ जुलै रोजी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. तेल्हारा, पातूर, बाळापूर शहरात शासकीय कार्यालयांमध्ये अनेक ठिकाणी केवळ खड्डेच उरले असून, त्यातील रोप गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा वन परिक्षेत्रातही असेच चित्र आहे.
तेल्हारा शहरात पंचायत समिती कार्यालय व कृषी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले; मात्र वृक्षारोपण केवळ फोटोसेशनपुरतेच झाले आहे. या झाडांची नीगा राखायची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नसल्याने अनेक झाडे सुकली आहेत. पंचायत समिती परिसरातील अनेक झाडांची ट्री गार्ड बाजूला पडलेली आढळली व त्यातील झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. कृषी कार्यालयातील रोपांचीही तीच अवस्था झाली आहे. तालुक्यात वृक्ष लागवडही संथगतीने सुरू आहे. उद्दिष्ट ५,२०० झाडांचे असताना आतापर्यंत केवळ फक्त १०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे, उद्दिष्टपूर्ती तर दूरच त्याच्या जवळही जाणे अशक्यच असल्याचे दिसत आहे.
पातुरात केवळ खड्डेच खोदले!
पातूर शहरातही अनेक रोप सुकल्याचे चित्र आहे. तालुक्यात ४८ हजार ३५० वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट देण्यात आले. २४० ठिकाणी आतापर्यंत ३६ हजार ४६६ रोप लागवड करण्यात आल्याचे रोप लागवडचे पातूर तालुका समन्वयक तथा वन विभागाचे आरएफओ जी. डी. देशमुख यांनी सांगितले; मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता नगरपालिकेच्या आवारात रोप लागवड न करताच फक्त खड्डेच करण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये रोपांचे रोपण न करता करता खड्ड्याच्या बाजूलाच रोपटे टाकून देण्यात आले आहे. त्या ठिकाणी जवळपास ८० रोप लागवड करण्यात आली आहे. पातूर परिसरातील कार्यालयाजवळ लावण्यात आलेल्या रोपांचीही अवस्था दूर्लक्षीत झाली असून, झाडे सुकली आहेत.
लोहगड वन वर्तुळातील वृक्ष सुकले
बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड वन वर्तुळातील कं पार्टमेंट नं. ११२ मध्ये २५ हेक्टर क्षेत्रफळावर १३ हजार २५० रोपांची लागवड करण्यातआली; मात्र त्यांच्या संवर्धनाकडे लक्षच दिले नसल्याने यातील अनेक रोप पाण्याभावी सुकली आहेत.
यातील किती रोप प्रत्यक्ष जगतील यामध्ये संशयच आहे. लोहगड ते सकणी मार्गावर सामाजिक वनीकरणचे अनेक रोप रस्त्याच्या दुतर्फा करपलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
वनपरिक्षेत्र कार्यालयाने ८२ गावांना ३२ हजार ८०० रोपांचा पुरवठा केला. यातील काही रोपे ग्रामपंचायतींनी लावली तर काही ठिकाणी तशीच पडून आहेत. रोपे जगवण्याची जबाबदारी निश्चित नसल्याने त्यांचे संवर्धन होत नसल्याचे चित्र आहे.
बाळापुरात खड्डेच उरले!
शासनाने उद्दिष्ट दिले म्हणून बाळापूर शहरातील विविध शाासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले; मात्र त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी न घेल्याने अनेक वृक्ष सुकली आहेत. पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेल्या वृक्षांना पाणीच देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. नगरपालिका उद्यानात रोपे गायब असून, तेथे पिशव्याच शिल्लक उरल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वृक्षारोपणासाठी खोदलेले खड्डेच शिल्लक आहेत. त्यातील रोपे पाण्याअभावी सुकली आहेत.