दिल्लीच्या धर्तीवर राबविणार प्लाझ्मा थेरपी जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:18 AM2020-07-21T10:18:01+5:302020-07-21T10:18:15+5:30
राज्यभरात प्लाझ्मा थेरपीविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
अकोला : कोरोनावर प्रभावी औषध नसले, तरी प्लाझ्मा थेरपीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे; मात्र यासाठी आवश्यक प्लाझ्मा देण्यासाठी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आता राज्यभरात प्लाझ्मा थेरपीविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी थेट कोविड रुग्ण भरती असलेल्या वॉर्डपासूनच सुरुवात केली जाणार आहे.
प्लाझ्मा थेरपीविषयी जनजागृतीचा हा उपक्रम दिल्लीच्या धर्तीवर राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. कोविडची लक्षणे असणारी व्यक्तीच प्लाझ्मा दान करू शकत असल्याने ही मोहीम थेट कोविड वॉर्डातच राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कोविड वॉर्डामध्ये जनजागृतीविषयी फलके लावण्यात येणार आहेत. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे एक परिपत्रक काढण्यात आले असून, त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
रुग्णांचे समुपदेशनही होईल
केवळ कोविड वॉर्डात जनजागृती फलक लावून ही मोहीम यशस्वी होणार नाही. त्यामुळे रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांचे समुपदेशनही केले जाणार असल्याची माहिती आहे. हा प्रयोग शसस्वी झाल्यास प्लाझ्मा दाते सहज उपलब्ध होण्यास मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाच्या परिपत्रकानुसार, कोविड वॉर्डात फलकांद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शिवाय, कोविड रुग्णांशी विविध माध्यमातून संवाद साधून त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न राहील.
- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी,जीएमसी, अकोला