‘प्लाझ्मा थेरपी’ला नियमांचे अडथळेच जास्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:22 AM2020-07-04T10:22:03+5:302020-07-04T10:22:10+5:30
प्लाझ्मा दान करण्यासाठी दात्यांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने अनेक जण योग्य प्रतिसाद देत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना प्लाझ्मा थेरपीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे; मात्र किचकट प्रक्रियेमुळे बरे झालेल्या रुग्णांचे रक्त संकलनात आरोग्य विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही जण प्लाझ्मा देण्यास तयारही आहेत; परंतु प्लाझ्मा दान करण्यासाठी दात्यांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने अनेक जण योग्य प्रतिसाद देत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
कोरोनावर अद्यापही प्रभावी औषध आले नाही; परंतु प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचाराला मान्यता मिळाल्याने सर्वसामान्यांच्या आशा वाढल्या आहेत. सर्वोपचार रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरूदेखील झाली असून, आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या तीन रुग्णांनी प्लाझ्मा दान केले. प्लाझ्मा दान करण्यासाठी जवळपास ४० बरे झालेल्या रुग्णांची यादी शासकीय रक्तपेढीने तयार केली आहे; परंतु किचकट प्रक्रियेमुळे प्लाझ्मासाठी रक्तसंकलनात आरोग्य यंत्रणेला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
यातील सर्वात मोठी अडचणी म्हणजे ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे होती, त्यांच्याच रक्तामधून प्लाझ्मा घेणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले; परंतु जिल्ह्यात आतापर्यंत दाखल बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नव्हती.
त्यामुळे त्यांच्यात आवश्यक अॅन्टी बॉडिज विकसित झालेल्या नसल्याने त्याचा फायदा प्लाझ्मा थेरपीमध्ये शक्य नाही.
या आहेत समस्या
- बहुतांश रुग्णांना कोरोनाची लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांचे रक्त संकलन शक्य नाही.
- लक्षणे असणारे रुग्ण बरे झाल्यावर रक्तदान करण्यास तयार नाहीत.
- रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवसांची करावी लागते प्रतीक्षा.
- बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी पर्याप्त मनुष्यबळ नाही.
अशी आहे प्लाझ्मा दान करण्याची प्रक्रिया
कोरोनाची लक्षणे असणारा रुग्ण बरा होऊन २८ दिवसांनी प्लाझ्मा दान करू शकतो.
त्यासाठी त्याला प्रथम टेस्टिंगसाठी बोलावले जाते.
यामध्ये व्यक्तीचे वजन, हिमोग्लोबीन, प्लेटलेट्ससह इतर चाचण्या केल्या जातात.
त्यानंतर दात्याला रक्तसंकलनासाठी पुन्हा बोलावले जाते.
कोण करू शकतो प्लाझ्मा दान?
ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे होती.
हिमोग्लोबिन १२.५ असणे आवश्यक
वजन ५० किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक
१८ ते ६० वर्ष वयोगटातील रुग्ण
कोरोनाची लक्षणे असणारा रुग्ण बरा झाल्यावर २८ दिवसांनी त्याच्याकडून प्लाझ्मा संकलित करणे शक्य आहे; मात्र या उपचारपद्धतीसाठी काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- डॉ. श्रीराम चोपडे,
विभाग प्रमुख, शासकीय ब्लड बँक, जीएमसी, अकोला