अमरावती विभागात ‘प्लाझ्मा थेरपी’ची अद्याप अंमलबजावणी नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:38 AM2020-07-06T11:38:16+5:302020-07-06T11:39:16+5:30
रुग्णांची प्लाझ्मा देण्यास टाळाटाळ अन् रुग्णांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ असलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे विभागात अद्यापही ‘प्लाझ्मा थेरपी’ची अंमलबजावणी झाली नाही.
अकोला : आरोग्य विभागाच्या अकोला मंडळात अकोल्यासह अमरावती आणि यवतमाळ येथे प्लाझ्मा थेरपीला शासनाने मान्यता दिली होती; परंतु किचकट प्रक्रियेमुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची प्लाझ्मा देण्यास टाळाटाळ अन् रुग्णांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ असलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे विभागात अद्यापही ‘प्लाझ्मा थेरपी’ची अंमलबजावणी झाली नाही.
कोरोनावर अद्यापही प्रभावी औषध आले नाही; परंतु प्लाझ्मा थेरपीकडे अनेक जण आशेने बघत आहे. शासनातर्फेही या थेरपीला मान्यता दिल्याने आरोग्य विभागाच्या अकोला मंडळात अकोल्यासह अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी तशी तयारीदेखील करण्यात आली आहे. प्लाझ्मा संकलनासाठी आरोग्य यंत्रणेतर्फे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची यादीही काढली; परंतु किचकट प्रक्रिया आणि बरे झालेल्या रुग्णांच्या अनुत्साहामुळे आरोग्य यंत्रणेला प्लाझ्मासाठी रक्त संकलनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर बरे झालेल्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणेला कमी मनुष्यबळाचाही सामना करावा लागत आहे.
अनेकांमध्ये अॅन्टी बॉडिजचे प्रमाण कमी
आतापर्यंत विभागात समोर आलेल्या कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य किंवा कुठलीच लक्षणे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या शरीरात कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी अॅन्टी बॉडिज विकसित झाल्याच नाहीत किंवा फार कमी झाल्या आहेत. त्यामुळे अशा रुग्णांच्या रक्ताचा फायदा प्लाझ्मा थेरपीमध्ये होऊ शकत नाही.
२८ दिवसांची प्रतीक्षा
लक्षणे असलेला रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा थेरपीसाठी त्याचे रक्त संकलन करावे लागते. सुरुवातीला कोरोनातून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांसोबत प्रभावी संपर्क झाले नाही; परंतु गत काही दिवसात बरे झालेल्या रुग्णांसोबत आरोग्य यंत्रणा संपर्क साधत आहेत; मात्र त्यांच्याकडून प्लाझ्मासाठी रक्त संकलनासाठी २८ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोण करू शकतो प्लाझ्मा दान?
- ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे होती.
- हिमोग्लोबिन १२.५ असणे आवश्यक
- वजन ५० किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक
- १८ ते ६० वर्ष वयोगटातील रुग्ण
बरे झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मासाठी रक्त संकलनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही डोनरसोबत संपर्क झाला आहे. त्या दृष्टिकोनातून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय ब्लड बँक, जीएमसी, अकोला