अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझमा युनिट कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 04:02 PM2020-06-29T16:02:21+5:302020-06-29T18:41:38+5:30
प्लाजमा फोरेसिस युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील ‘प्लाझ्मा फोरेसिस युनिट’चे सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उद््धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद््घाटन करण्यात आले. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून कोरोनाबाधितांवर प्रभावी उपचार करणे शक्य होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘प्लाझ्मा फोरेसिस युनिट’ सोमवारपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्लाझ्मा थेरिपी युनिट सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे ७० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, तर राज्य शासनाद्वारे ‘आॅटोमेटेड ब्लड कलेक्शन सिस्टम’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे युनिट वेळेत सुरू झाले असून, त्याचा फायदा अकोलेकरांना होणार आहे. उद््घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री बच्चू कडू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संदीप चिंचोले तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच डॉ. आंभोरे, डॉ. नैताम, डॉ. शिरसाम, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख आदी उपस्थित होते.
रक्तदात्यांचीही उपस्थिती
प्लाझ्मा थेरपी युनिटच्या उद््घाटनप्रसंगी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांनी प्लाझ्मा डोनेट करून कोरोना विरुद्धच्या लढ्यात साथ दिली. तसेच डॉक्टरांचाही सहभाग होता.
असे काम करते प्लाझ्मा फोरेसिस?
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठीक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. रक्ताचा वापर करून अँटीबॉडिजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. त्यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडिज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडिज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्माफेरसिस या यंत्राद्वारे प्लाझ्मा संकलित केला जातो. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा, हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, आॅक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.