प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला; मनपाने ठोठावला दहा हजारांचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:17 PM2018-09-18T12:17:45+5:302018-09-18T12:18:03+5:30
तेलीपुरा चौकातील ए-वन बॅग प्रतिष्ठानवर प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी दोन्ही व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई मनपाच्या आरोग्य निरीक्षकांनी केली.
अकोला: शासनाने प्लास्टिकपासून तयार केल्या जाणाऱ्या पिशव्यांसह विविध साहित्याच्या वापरावर बंदी घातली असली तरी अद्यापही शहरातील व्यावसायिक प्लास्टिक पिशव्या व साहित्याचा वापर करीत असल्याचे समोर येत आहे. सोमवारी दक्षिण झोन अंतर्गत येणाºया गोरक्षण रोडस्थित इन्कमटॅक्स चौकातील जैन क्रिएशन व उत्तर झोनमधील तेलीपुरा चौकातील ए-वन बॅग प्रतिष्ठानवर प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी दोन्ही व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई मनपाच्या आरोग्य निरीक्षकांनी केली.
प्लास्टिकपासून विविध वस्तू तयार केल्या जातात. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाला हानी होत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह इतर वस्तू व थर्माकॉलच्या वापरावर बंदी घातली आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भात वेळोवेळी आवाहन केले जात असले तरी काही व्यावसायिक, दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. अशा व्यावसायिकांच्या दुकानांची तसेच प्रतिष्ठाणांची तपासणी करून संबंधितांविरोधात कारवाई केल्या जात आहे. सोमवारी दक्षिण झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पूनम कळंबे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य निरीक्षकांनी गोरक्षण रोडवरील इन्कमटॅक्स चौकातील जैन क्रिएशन प्रतिष्ठानची झाडाझडती घेण्यात आली असता, प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. हा साठा ताब्यात घेऊन व्यावसायिकाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली. उत्तर झोन अंतर्गत तेलीपुरा चौकातील एवन बॅग दुकानाची तपासणी केली असता बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.