अकोला शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा; बाजारात खुलेआम विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:26 PM2019-01-11T12:26:47+5:302019-01-11T12:26:53+5:30
अकोला: राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे.
अकोला: राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांना दंड न करता प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका व जिल्हा प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नसल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरातील सर्व्हिस लाइन, सार्वजनिक जागा, नाल्या, गटारे आदी ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे दिसून येते. नाले-गटारांमधील घाण पाणी वाहून जाण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा अडसर ठरत आहेत. उघड्यावर साचलेल्या प्लास्टिक पिशव्यांमधील खाद्यपदार्थ खाल्ल्याने मोकाट जनावरांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. एकूणच प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी व कचºयाची निर्माण झालेली समस्या आदी बाबी ध्यानात घेता पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात शासनाने दंडात्मक कारवाईची तरतूद केल्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका व जिल्हा प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्यामुळे शहरात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर केला जात आहे.
तीन महिन्यांचा कारावास!
शासनाने प्लास्टिक पिशव्या वापरणाºया व्यावसायिकांवर पहिल्यांदा पाच हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. दुसºयांदा १० हजार रुपये आणि तिसºयांदा वापर करताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास अशी तरतूद केली. आजपर्यंत मनपा प्रशासनाने थातूरमातूर कारवाया करून वेळ मारून नेल्याचे दिसून येते. आजपर्यंत कारावासाची शिक्षा होईल, अशी एकही कारवाई मनपा किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली नाही, हे येथे उल्लेखनीय.