सुखद...मेळघाटात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:51 AM2020-05-10T10:51:16+5:302020-05-10T10:51:32+5:30

अकोट, सिपना, गुगामल, मेळघाट, अकोला व पांढरकवडा अशा विभागात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन घडले.

Pleasant ... 17 thousand 186 animals in Melghat | सुखद...मेळघाटात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन

सुखद...मेळघाटात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन

Next

- विजय शिंदे
अकोट: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता वन विभागाने ‘लॉकडाउन’च्या काळात आपल्या अधिनस्त असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली. त्यामध्ये अकोट, सिपना, गुगामल, मेळघाट, अकोला व पांढरकवडा अशा विभागात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन घडले. यामध्ये अकोट वन्यजीव विभागांतर्गत ३,०१६ प्राण्यांची नोंद झाली.
पौर्णिमेच्या रात्री मचानवर बसून वन्य प्राण्यांची प्रगणना व निसर्गाचा आनंद घेण्याकरिता वन्यप्रेमींमध्ये उत्कंठा असते. मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरू, अमरावती व अकोला या ठिकाणांवरून वन्यप्रेमी प्राणी गणनेत सहभाग नोंदवितात; परंतु कोरोनामुळे यावर्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५४६ मचानची बांधणी करण्यात आली. या मचानवर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आलेल्या प्राण्यांची नोंद घेतली. विशेष म्हणजे, या प्राणी गणनेत क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी हे स्वत: सहभागी झाले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चार वन्यजीव विभागांतील १८ वनपरिक्षेत्रात तसेच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाºया अकोला व पांढरकवडा वन्यजीव विभागातील ६ अभयारण्यांमध्ये प्राणी गणना करण्यात आली. या सर्व मचानवरून ३५ वाघ, ४० बिबट, ३४० अस्वल, १७२ रानकुत्रे, ७५२ गवे शिवाय इतर प्राणी आढळून आले. प्राणी गणनेचा निसर्ग अनुभव उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्यात लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. अशा स्थितीत वन विभागामध्ये वन्यप्रेमींना जाण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे प्राणीप्रेमींना वन्य प्राणी प्रगणनेपासून पहिल्यांदाच वंचित राहावे लागले आहे.

अकोट वन्यजीव विभागात ३ हजार १६ प्राण्यांचे दर्शन
अकोट वन्यजीव विभागांतर्गत १४० मचान उभारले होते. या मचानावरून केलेल्या प्राणी गणनेमध्ये वाघ ४, बिबट ८, अस्वल ५३, जंगली श्वान ७४, रानगवा १८८, रानडुक्कर ४०९, सांबर २७१, चितळ १०७, बार्किंग हरीण ९५, चारसिंगी हरीण १, साळ १६, खवल्या मांजर २१, तडस ४, नीलगाय २८३, लंगुर ८९८, मुंगूस ३, जंगली मांजर ३५, रानकोंबडी १४२, कोल्हा २, जॅकल ३, ससा ७, मोर ३९१ असे एकूण ३,०१६ वन्य प्राणी आढळून आल्याची नोंद घेण्यात आली आहे.


कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्टÑ वन विभागाने या निसर्ग अनुभव उपक्रमामध्ये वन विभागातील कर्मचारीच सहभागी होऊ शकतील, असा आदेश होता. त्यामुळे बाहेरील कोणाला सहभागी होता आले नाही. या प्राणी गणनेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये १७ हजार १८६ वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे निसर्गाच्या दृष्टीने संपन्न असून, वन्यजीवाच्या बाबतीत महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.
- श्रीनिवास रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक
मेळघाट व्याघ्र प्रकल्प.

 

Web Title: Pleasant ... 17 thousand 186 animals in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.