वरूर जऊळका-बळेगाव रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:59+5:302021-09-21T04:20:59+5:30
वरूर जऊळका : वरूर जऊळका-बळेगाव रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. या मार्गाने अनेक शेतकऱ्यांची ...
वरूर जऊळका : वरूर जऊळका-बळेगाव रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. या मार्गाने अनेक शेतकऱ्यांची शेती असून, शेतकऱ्यांची ये-जा सुरूच राहते. रस्ता चिखलमय झाल्याने रस्त्याने चालताना कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
वरूर जऊळका-बळेगाव रस्ता शेतरस्ता असून, या मार्गाचे डांबरीकरण, खळीकरण झाले नाही. शेतकऱ्यांना या रस्त्याने जाताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याने शेतकरी शेतमाल आणताना बंडी किंवा ट्रॅक्टरचा वापर करतो. मात्र, हा मार्ग चिखलमय झाल्याने या मार्गाने वाहन ने-आण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता मंजूर होण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला पत्र दिले आहे, परंतु अद्यापही या रस्त्याची दयनीय अवस्थाच आहे. वरूर जऊळका ते बळेगाव हा जवळपास सहा कि.मी.चा रस्ता असल्याने या मार्गाने नेहमीच वाहतूक असते. रस्ता चिखलमय झाल्याने रस्त्याने चालणेही कठीण झाले असल्याने या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
---------------------
सहा वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून खडीकरण
वरूर जऊळका-बळेगाव रस्त्याचे सहा वर्षांपूर्वी वरूर जऊळकापासून तीन किलोमीटरपर्यंत लोकवर्गणीतून खडीकरण करण्यात आले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, सद्य:स्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याचे खडीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.