स्वस्त धान्याचा गहू काळ्या बाजारात नेण्याचा डाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:15+5:302021-09-18T04:21:15+5:30
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई अकोला : खामगाव येथून एका ट्रकमध्ये तब्बल सहाशे पोते गहू तेलंगणा ...

स्वस्त धान्याचा गहू काळ्या बाजारात नेण्याचा डाव उधळला
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई
अकोला : खामगाव येथून एका ट्रकमध्ये तब्बल सहाशे पोते गहू तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असताना, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने बाळापूरनजीक पाळत ठेवून ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर, झडती घेतली असता, या ट्रकमधील तब्बल सहा लाख रुपयांच्या गव्हासह २६ लाख रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी रात्री उशिरा जप्त केला.
खामगाव येथून एपी २० टीबी ४६९९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील गहू भरून, तो तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून, पाटील यांनी पथकासह बाळापूरनजीक राष्ट्रीय महामार्गावर पाळत ठेवून सापळा रचला. त्यानंतर, स्वस्त धान्याचा गहू घेऊन येणारा ट्रक येताच, त्यांनी ट्रकला अडविले. ट्रकमधील धान्याची तपासणी केली असता, ट्रकमधील गहू स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे समोर आले. त्यानंतर, पोलिसांनी ६०० क्विंटल गहू व ट्रक असा एकूण २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ट्रकचा चालक शेख जावेद शेख खाजा वय २८ वर्षे, राहणार- आदिलाबाद खानापूर राज्य तेलंगणा यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात भारतीय जीवनावश्यक अधिनियम १९५५च्या कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.
जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार जोरात
अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरून स्वस्त धान्य दुकानातील गहू तांदूळ व इतर धान्याची काळ्या बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू असल्याचे, अकोला पोलिसांनी केलेल्या कारवायांवरून समोर आले आहे. यापूर्वी हिवरखेड येथे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून चार ट्रक गहू व तांदूळ जप्त केला होता. त्यानंतर, शहरातील विविध भागांतही धान्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. आता खामगाव येथून येणारा धान्याचा साठा जप्त केल्याने अकोला व बुलडाणा जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे वास्तव आहे.