‘पीएम आवास’चा तिढा निकाली निघेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 10:56 AM2021-03-17T10:56:40+5:302021-03-17T10:56:47+5:30
PM awas yojana पंतप्रधान आवास याेजनेतील पात्र लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित असल्याचे चित्र आहे.
अकाेला: शहरात केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेतील पात्र लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित असल्याचे चित्र आहे. अनेकांनी घरे मंजूर झाल्यामुळे बांधकामाला सुरूवात केली. यादरम्यान, हप्ते थकीत असल्याने लाभार्थ्यांवर संकट काेसळल्याची परिस्थिती आहे. या मुद्यावर मंगळवारी महापाैर अर्चना मसने, सभापती संजय बडाेणे यांनी स्थायी समितीच्या सभागृहात याेजनेचा आढावा घेतला.
शहरात सहा हजार घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. गावठाण व गुंठेवारी जमिनीच्या संदर्भातील सर्व प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आले नाहीत. शहरातील झोपडपट्टी भागांमधील आरक्षण कायम असून ते अद्यापही हटविण्यात आले नाही. या सर्व बाबी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापाैर अर्चना मसने, सभापती संजय बडाेणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आवास याेजनेचे प्रस्ताव मार्गी लागण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाने व शुन्य कन्सलटन्सीने प्रामाणीकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले नगर येथील घरकुलांचे प्रस्ताव तयार करून शासनाची मंजुरी घेउन कामे सुरू करण्याची सुचना देण्यात आली. आढावा बैठकीला प्रभारी नगररचनाकार संजय नाकोड, प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर, लेखापाल अतुल दलाल, तांत्रिक सल्लागार एजन्सीचे मनीष भुतडा, माजी नगरसेवक जयंत मसने, सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ उपरवट, आवास योजना कार्यालयातील श्रीकांत माणिकराव, विशाल गवई आदिंची उपस्थिती होती.