‘पीएम आवास’ योजना; लाभार्थींच्या खात्यात आठ दिवसांत निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 03:20 PM2020-02-28T15:20:13+5:302020-02-28T15:20:18+5:30
उपायुक्त वैभव आवारे यांनी लाभार्थींच्या खात्यात आठ दिवसांत निधी जमा करण्याचे आश्वासन दिले.
अकोला: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतर मनपाने गत वर्षभरापासून पुढील अनुदानाचा हप्ताच दिला नसल्याप्रकरणी प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी मनपा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुुरू केले होते. या उपोषणाची सत्ताधारी भाजपाने दखल घेऊन त्यातून मार्ग काढणे अपेक्षित असताना गुरुवारी विरोधी पक्षनेता साजीद खान, उपायुक्त वैभव आवारे यांनी लाभार्थींच्या खात्यात आठ दिवसांत निधी जमा करण्याचे आश्वासन दिले. उपोषणकर्त्यांना ज्युस पाजून उपोषण मागे घेण्यात आले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उभारण्याचे आश्वासन केंद्रासह तत्कालीन राज्य शासनाने दिले होते. योजनेचे निकष पाहता लाभार्थींची उपेक्षा केली जात असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील शिवर परिसरातील लाभार्थींची घरे मंजूर झाली. लाभार्थींनी घरांच्या बांधकामाला सुरुवात केल्यानंतर पहिल्या टप्प्याचा हप्ता वितरित झाला. त्यानंतर वर्षभरापासून लाभार्थींना मनपाने एक छदामही अदा केला नाही. परिणामी, अंगावरचे सोने विकून, खासगी सावकारांकडून पैसे घेऊन घरे बांधणारे लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. उर्वरित अनुदानाची रक्कम खात्यात जमा होईपर्यंत संबंधित लाभार्थींनी मनपासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. निधी का रखडला, याबद्दल विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी सविस्तर माहिती घेऊन प्रशासनासोबत चर्चा केली. यावेळी उपायुक्त वैभव आवारे यांनी केंद्र शासनाकडून म्हाडाला निधी प्राप्त होताच लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे सांगितले. याकरिता किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल.
उपोषणकर्त्यांची घातली समजूत
प्रभाग क्रमांक १३ मधील उपोषणकर्त्यांची साजीद खान व उपायुक्त वैभव आवारे यांनी भेट घेऊन त्यांना निधीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रभागातील चारही नगरसेवक सत्ताधारी भाजपाचे असले तरी आमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नसल्याची भावना उपोषणकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यावर साजीद खान व उपायुक्त आवारे यांनी उपोषण मंडपातील नागरिकांची समजूत घातली.
मनपासह केंद्रात सत्ता असूनही भाजपाकडून लाभार्थींच्या समस्येला केराची टोपली दाखविल्या जात आहे. यासंदर्भात आम्ही शासनाकडे निधीसाठी ठोस पाठपुरावा करू.
-साजीद खान पठाण, विरोधी पक्षनेता मनपा.