सॅटेलाईटद्वारे होणार नुकसानाचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 10:38 AM2021-04-07T10:38:38+5:302021-04-07T10:39:34+5:30
Agriculture News : सॅटेलाईटच्या माध्यमातून नुकसानाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे.
अकोला : मार्च महिन्यात १७ ते २१ दरम्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाने ५ हजार २१७ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करून सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत; मात्र सॅटेलाईटच्या माध्यमातून नुकसानाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. याबाबतचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.
मागील महिन्यात जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळाबरोबरच गारपीट झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळिराजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोट तालुक्यात गहू, लिंबू, पपई, कांदा बियाणे पीक, आंबा, कांदा, हरभरा व भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. काढणीस आलेला गहू, कांदा पिके जमीनदोस्त झाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने विभागीय कृषी संचालक यांना सादर केला. यामध्ये ५ हजार २१७ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचे सांगितले. पिकांचे नुकसान होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे; परंतु पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता हे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत न करता सॅटेलाईटच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. प्राथमिक अहवालाच्या आधारे तपशील पाठविण्याचे पत्र कृषी संचालक यांच्याकडून प्राप्त झाले आहे.