लहान मुलांच्या ‘न्यूमो कॉकल’ लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 10:45 AM2021-07-08T10:45:15+5:302021-07-08T10:47:28+5:30
Pneumococcal vaccination : बॅक्टेरियल न्यूमोनियापासून संरक्षण देणाऱ्या न्यूमो कॉकल या लसीचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती आहे.
- प्रवीण खेते
अकोला: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असतानाच लहान मुलांना कोविड सोबतच बॅक्टेरियल न्यूमोनियाचाही धोका आहे. यापासून संरक्षणासाठी सोमवार १२ जुलैपासून राज्यभरात ९ महिन्यांच्या आतील बालकांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. लसीकरणांतर्गत बालकांना बॅक्टेरियल न्यूमोनियापासून संरक्षण देणाऱ्या न्यूमो कॉकल या लसीचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, ताेच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यासोबतच लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाचाही धोका वर्तविला जात आहे. यापासून लहान मुलांच्या संरक्षणासाठी शासनामार्फत विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार, ही लसीकरण मोहीम सोमवार १२ जुलैपासून राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत बालकांना तीन टप्प्यात लस दिली जाणार असल्याची माहिती आहे. या लसीकरणामुळे लहान मुलांचे बॅक्टेरियल न्यूमोनियापासून संरक्षण होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
विभागासाठी मिळाले १२ हजार डोस
लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाच्या अकोला मंडळासाठी पंधरा दिवसांपूर्वीच ‘न्यूमो कॉकल’ लसीचे १२ हजार ६०० डोस प्राप्त झाले आहेत. यापैकी १६०० डोस हे अकोला जिल्ह्यासाठी असल्याची माहिती आहे.
तीन टप्प्यात तीन डोस
- ‘न्यूमो कॉकल’ ही लस ९ महिन्याच्या आतील बालकांना दिली जाणार असल्याची माहिती आहे.
- त्या अंतर्गत पहिला डोस ६ आठवड्याच्या बालकांना.
- दुसरा डोस १४ आठवड्याचा बालकांना.
- तिसरा डोस ९ महिन्याच्या बालकांना दिला जाणार आहे.
लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी लहान मुलांच्या लसीकरणाला १२ जुलैपासून सुरुवात करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी अकोला जिल्ह्यासाठी ‘न्यूमो कॉकल’ लसीचे १६०० डोस प्राप्त झाले आहेत.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, लसीकरण, अकोला