कविसंमेलन : ‘पण मला एका मुलीचा बाप कर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:16 AM2020-02-02T11:16:20+5:302020-02-02T11:16:41+5:30
सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी दुपारच्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पुरुषांना निसर्गाने कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व प्रदान केले आहे; मात्र स्त्रियांना मातृत्व दिले आहे. मातृत्व जगातील सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात सुंदर गोष्ट आहे. अनादी काळापासून भारतात स्त्रियांना सन्मानच मिळाला आहे; परंतु आज देशात स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. भ्रूणहत्याही करण्यात येते. एवढी अपमानास्पद वागणूक स्त्रियांना मिळत आहे. यावर समर्पक अशी कविता युवा कवी गोपाल मापारी यांनी सादर केली. ‘पुण्यही माझे विधात्या पाप कर, पण मला एका मुलीचा बाप कर’ या ओळींना सभा मंडपातील उपस्थितांनी भरभरू न दाद दिली.
सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी दुपारच्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन केले होते. हे संमेलन महिलांना समर्पित असल्यामुळे कविसंमेलनातदेखील कवींनी आपल्या रचनांमधून स्त्री आणि आजची परिस्थिती, यावर प्रकाशझोत टाकला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अरविंद भोंडे होते. यामध्ये प्रस्थापितांसह नवोदित कवींचादेखील समावेश होता. नरेंद्र इंगळे, सुरेश पाचकवडे यांच्यासह विद्या बनकर, कविता राठोड, गोपाल मापारी, वैभव भिवरकर, डॉ. विनय दांदळे, विशाल कुलट, प्रकाश सरोदे व मंदाकिनी खरडे सहभागी झाल्या होत्या. कविसंमेलनाचे बहारदार संचालन अॅड़ अनंत खेळकर यांनी केले.
संमेलनाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिल्या. विद्या बनाफर यांनी मन सुन्न करणारी ‘गावाकडे चला’ ही रचना सादर केली. गाव सोडून शहरात गेलेल्या मुलाची आई किती वाट पाहत असते, याचे सुंदर वर्णन बनाफर यांनी कवितेत करू न, वृद्धांच्या समस्या मांडल्या. मंदाकिनी खरडे यांनी ‘स्वर्ग’ कविता सादर केली. डॉ. विनय दांदळे यांनी ‘पाणी’ ही कविता सादर करू न आज ग्लोबल वार्मिंगच्या युगात पाण्याची कशी बिकट समस्या निर्माण झाली, याचे विदारक दृश्य मांडले. प्रकाश सरोदे यांनी माणुसकीवर कविता सादर केली. वैभव भिवरकर या युवा कवीने प्रजासत्ताक दिनावर कविता सादर केली.
‘माणसे मला न भेटली. कट्टरता भेटली गडे हो’ या ओळी भाव खाऊन गेल्या. यावर अनंत खेळकर यांनीदेखील त्यांनी प्रजासत्ताक दिनावर रचलेल्या कवितांच्या ओळी ऐकविल्या. ‘राजकारणात प्रवेशसुद्धा इन्कम सोर्स होतो... लोकशाहीच्या खचलेल्या खांद्यावर माझ्या लोकशाहीची पालखी आहे...’ या ओळीवर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विशाल कुलट या नवोदित कवीने ‘छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांच्यावरील कविता स्फूर्तीने गायिली. सुरेश पाचकवडे यांनी ‘कधी तरी उतरावे मनाच्या खोल दरीत अन् भिजावे निवांत आठवणींच्या दरीत’, अशा ओळींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. नरेंद्र इंगळे यांनी ‘पोथी’ कविता सादर करू न अंधश्रद्धेवर प्रहार केला. संमेलनाचे अध्यक्ष अरविंद भोंडे यांनी ‘लुगडं’ ही कविता सादर करू न रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.