पोही गावाचे ‘जमादारी’मध्ये पुनर्वसन!
By admin | Published: June 30, 2017 01:00 AM2017-06-30T01:00:43+5:302017-06-30T01:00:43+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील उमा मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील पोही गावाचे पुनर्वसन पोही शिवारातील ‘जमादारी’ भागात करण्यात येणार आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी जमादारी ठिकाण निश्चित करण्याचा निर्णय गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत निश्चित करण्यात आला.
पोही गावाच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीला आमदार हरीश पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) गजानन सुरंजे, भूसंपादन अधिकारी विजय लोखंडे, मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाणी, तहसीलदार राहुल तायडे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते. उमा मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात पोही गावातील बाधित होणाऱ्या घरांची संख्या ५३९ असून, १ हजार २९४ लोकसंख्या आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी पोही शिवारातील जमादारी ठिकाण निश्चित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार बुडीत क्षेत्रातील पोही गावाचे पुनर्वसन जमादारी भागात करण्यात येणार आहे. पुनर्वसनाची पुढील प्रक्रिया मूर्तिजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.